शुल्काचे दरपत्रक लावा, अन्यथा कारवाई !
By Admin | Updated: May 26, 2017 02:57 IST2017-05-26T02:57:19+5:302017-05-26T02:57:19+5:30
महा ई-सेवा केंद्रांना ‘एसडीओं’नी बजावली नोटिस

शुल्काचे दरपत्रक लावा, अन्यथा कारवाई !
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विविध दाखले आणि प्रमाणत्रांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात नागरिकांची लूट होऊ नये, यासाठी दाखले व प्रमाणपत्रांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दरपत्रक आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी दर्शनी भागात लावण्यात यावी, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अकोल्याचे उपविभागीय (एसडीओ) ओमप्रकाश अग्रवाल यांनी गुरुवारी तालुक्यातील महा ई-सेवा केंद्रांना बजावलेल्या नोटिसद्वारे दिला आहे.
तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर दाखला, प्रतिज्ञालेख, वय, अधिवास व उत्पन्नाचे दाखले दिल्या जातात. विविध दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी महा ई-सेवा केंद्रांमार्फत नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्यात येतात. दाखले व प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारताना महा ई-सेवा केंद्रांकडून शुल्कापोटी वेगवेगळे दर आकारले जातात. त्यामुळे दाखले व प्रमाणपत्रांसाठी शुल्काचे वेगवेगळे दर आकारून नागरिकांची लूट होऊ नये, यासाठी प्रमाणपत्र व दाखल्यांसाठी नियमानुसार आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दरपत्रक आणि दाखले व प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी महा ई-सेवा केंद्रांच्या दर्शनी भागात ३१ मेपर्यंत लावण्यात यावी, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश अग्रवाल यांनी अकोला तालुक्यातील महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांना बजावलेल्या नोटिसमध्ये दिला आहे.
दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी शुल्काचे दरपत्रक आणि आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी ३१ मेपर्यंत महा ई-सेवा केंद्रांच्या दर्शनी भागात लावण्यात यावी, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात तालुक्यातील महा ई-सेवा केंद्र संचालकांना नोटिस बजावण्यात आली आहे.
-ओमप्रकाश अग्रवाल,
उपविभागीय अधिकारी, अकोला.