नुकसान भरपाई नाकारणार्या विमा कंपनीला चपराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:15 IST2017-08-26T01:14:59+5:302017-08-26T01:15:22+5:30
नुकसान भरपाई देण्यास नकार देणार्या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक मंचाने चपराक देत ग्राहकाला ५७ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुरुवारी जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत.

नुकसान भरपाई नाकारणार्या विमा कंपनीला चपराक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नुकसान भरपाई देण्यास नकार देणार्या विमा कंपनीला जिल्हा ग्राहक मंचाने चपराक देत ग्राहकाला ५७ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुरुवारी जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत.
शास्त्री नगरातील रहिवासी शंकरलाल एच. काबरा यांनी खामगाव येथील गोदामाचा १५ मे २0१५ रोजी विमा काढला होता. एक वर्षानंतर या विम्याची मुदत संपल्याने त्याचे नूतनीकरण केले. दरम्यान, २५ मार्च २0१६ रोजी एका ट्रकने या गोदामाला धडक दिली. यामध्ये गोदामाचे नुकसान झाले. शासकीय निरीक्षक यांनी नुकसानाची पाहणी केल्यानंतर १ लाख २0 हजार ५३८ रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल विमा कंपनीला दिला. त्यानुसार शंकरलाल काबरा यांनी नॅशनल इन्श्युरन्स विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केला; परंतु त्यांचा अर्ज विमा कंपनीने नामंजूर केला. शेवटी काबरा यांनी जिल्हा ग्राहक मंचांकडे २९ डिसेंबर २0१६ रोजी तक्रार अर्ज दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी अध्यक्ष एस. एम. उंटवाले, सदस्य भारती केतकर, डब्यू. व्ही. चौधरी यांच्या समक्ष झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐक ल्यानंतर ग्राहक मंचने नॅशनल इश्युरन्स विमा कंपनीला चपराक देत ग्राहकास ५0 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. तक्रारकर्त्यास मानसिक व शारीरिक त्रास झाल्यामुळे पाच हजार रुपये आणखी नुकसान भरपाई आणि न्यायालयीन खर्च २ हजार रुपये अशा ५७ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश दिले. काबरा यांच्यावतीने अँड. शिवम एस. शर्मा, अँड. अभय आर. रणपिसे यांनी कामकाज पाहिले.