वाहतूक मार्गात बदल
By Admin | Updated: May 14, 2014 23:15 IST2014-05-14T22:28:12+5:302014-05-14T23:15:24+5:30
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी असल्याच्या पृष्ठभूमीवर अकोला शहरातील वाहतुकीमध्ये बदल

वाहतूक मार्गात बदल
अकोला: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी असल्याच्या पृष्ठभूमीवर शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. अकोला ते मंगरूळपीर मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक एस.एस. ठाकूर यांनी कळविले आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी खदान परिसरातील सरकारी गोदामांमध्ये होणार असल्याने, रहदारी नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून अकोला ते मंगरूळपीर राज्य मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करून, इतर मार्गांवरून वळविण्यात आली आहे. अकोला ते मंगरूळपीर भागातील नागरिकांसोबतच, खडकी, चांदूर, कौलखेड, खदान भागातील नागरिकांनी शहरात येण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कौलखेड चौक, तुकाराम चौक, गोरक्षण वाय पॉईंट, हुतात्मा चौक, इन्कम टॅक्स चौक, गोरक्षण रोड, अशोक वाटिका चौक मार्गांचा वापर करावा. परतीच्या वेळीसुद्धा याच मार्गाचा वाहनचालक, नागरिकांनी वापर करावा. तसेच लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी गर्दी करणार्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी आपली वाहने मनपा दक्षता संकुलच्या पाठीमागील भागात पार्क करावीत. जेल चौक ते कौलखेड चौकदरम्यान कोणत्याही वाहनास प्रवेश दिला जाणार नाही. असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक एस.एस. ठाकूर यांनी कळविले आहे.