‘चांदा ते बांदा’ चित्ररथ आज अकोल्यात
By Admin | Updated: May 17, 2017 20:04 IST2017-05-17T20:04:29+5:302017-05-17T20:04:29+5:30
अकोला : वन विभागातर्फे चंद्रपूर येथून काढण्यात आलेला ‘चांदा ते बांदा’ चित्ररथ विविध शहरात प्रचार करीत गुरुवार, १८ मे रोजी अकोला शहरात दाखल होत आहे.

‘चांदा ते बांदा’ चित्ररथ आज अकोल्यात
ऑनलाइन लोकमत
अकोला : शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जनतेचा सहभाग व्हावा, तसेच हरित सेना सदस्यांची नोंदणी व्हावी, या उद्देशाने वन विभागातर्फे चंद्रपूर येथून काढण्यात आलेला ‘चांदा ते बांदा’ चित्ररथ विविध शहरात प्रचार करीत गुरुवार, १८ मे रोजी अकोला शहरात दाखल होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी ९ वाजता हा चित्ररथ पोहोचणार आहे. यावेळी संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत वर्ष २०१५-१६ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अकोला व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी तीन समित्यांचा समावेश असून, त्यांना अनुक्रमे, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
चित्ररथाचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उप वनसंरक्षक व विभागीय वन अधिकारी वि. ग. माने यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक नितीन गोंडाणे, सुनील जयस्वाल यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटनानंतर हा चित्ररथ बाळापूरकडे रवाना होणार आहे, अशी माहिती वन्य जीव कक्षप्रमुख गोविंद पांडे यांनी दिली.