राज्यस्तरीय ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुणे संघ विजेता
By Admin | Updated: December 14, 2014 23:34 IST2014-12-14T23:34:40+5:302014-12-14T23:34:40+5:30
अकोला येथील ५१ वी पुरुष व २७ वी महिला ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धा: शशीकांत व दीपाली बेस्ट वेटलिफ्टर.

राज्यस्तरीय ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुणे संघ विजेता
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकरी सदन येथे आयोजित ५१ वी पुरुष व २७ व्या महिला ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेचे विजेतेपद पुणे संघाने पटकाविले. पुरुषांच्या स्पर्धेचे उपविजेतेपद महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनी पुणे तर महिलांच्या स्पर्धेतील उपविजेतेपद नाशिक जिल्हा संघाने मिळविले. शशीकांत कदम व दीपाली गुरसाळे बेस्ट वेटलिफ्टिर ठरले.
रविवारी झालेल्या अंतिम फेरीमध्ये ६३ किलो वजनगटात नाशिकच्या निकीता काळे हिने प्रथम स्थान पटकाविले. सातार्याची सोनाली गवळी दुसर्या स्थानावर राहिली. पुण्याची तैसिम शेख हिने तिसरे स्थान पटकाविले. ६९ किलो वजनगटात सातार्याच्या मयूरी देवरे हिने नाशिकच्या श्रद्धा माळवतकरचा पराभव करीत सुवर्णपदक मिळविले. पुण्याची शरयू काळे हिने तृतीय स्थान मिळविले. ७५ किलो वजनगटात महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनीची कांचन टिकमकर प्रथम तर तिचीच संघ सहकारी किरण जोतवाणी हिने दुसरे स्थान मिळविले. ७५ किलोच्या वर वजनगटात कोल्हापूरची अश्विनी मळगे प्रथम, ठाण्याची आशिका भोईर द्वितीय आणि नाशिकची रेणुका नलावडे हिने तृतीय स्थान पटकाविले. स्पर्धेत २२४ पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले होते.
स्पर्धा समाप्तीनंतर लगेच झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला शिवसेना निवासी उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, सामाजिक कार्यकर्ते राजू दहातोंडे, महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष वरुण अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते एन.के.देशमुख, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त मधुरा सिंहासने, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत चोखळकर, अकोला जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुशील मोहोड यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना पदक बहाल करण्यात आले