सेंट्रल बँक ३५ लाखांचा घोटाळा प्रकरणातील आरोपींना जामीन नाकारला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:48+5:302021-07-07T04:23:48+5:30

हिवरखेड पोलीस स्टेशनअंतर्गत आरोपी दीपक सत्यनारायण भिलावेकर, राजेंद्र रामकृष्ण गावंडे व दिवाकर देवमन मंगळे यांच्यासह इतर आरोपींनी मिळून ...

Central Bank denies bail to accused in Rs 35 lakh scam | सेंट्रल बँक ३५ लाखांचा घोटाळा प्रकरणातील आरोपींना जामीन नाकारला!

सेंट्रल बँक ३५ लाखांचा घोटाळा प्रकरणातील आरोपींना जामीन नाकारला!

हिवरखेड पोलीस स्टेशनअंतर्गत आरोपी दीपक सत्यनारायण भिलावेकर, राजेंद्र रामकृष्ण गावंडे व दिवाकर देवमन मंगळे यांच्यासह इतर आरोपींनी मिळून आदिवासी समाजातील शेतकऱ्यांची ३५ लाख ९ हजार ४८३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. न्यायाधीश प्रथमवर्ग विजयकर यांनी तीन आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी करीत २ जुलै रोजी आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ अमर ननावरे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डी.डी. चव्हाण करीत आहेत.

असा झाला कर्ज वाटपाचा घोटाळा

आदिवासींना कर्ज वाटप प्रकरणात सेंट्रल बँक अडगाव बु. शाखेत तत्कालीन अधिकारी आणि दलालांनी मिळून ३५ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे चौकशी अहवालात सिद्ध झाले. आरोपींनी आदिवासी अशिक्षित लोकांना प्रलोभन दाखवून त्यांच्या शेतीवर कर्ज, पीक कर्ज व शेती साहित्याकरिता सेंट्रल बँकेतून परस्पर कर्ज काढून ती कर्जाची रक्कम आरोपींनी आपसात वाटून घेतली व आदिवासी लोकांची व बँकेची फसवणूक केली.

असा आला घोटाळा उघडकीस!

गुन्ह्यातील अर्जदारांनी गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध सेंट्रल बँक क्षेत्रीय कार्यालय अकोला येथे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार खातेनिहाय चौकशी केली. यामध्ये त्यांनी एकूण २४ खातेदारांच्या तपासणीमध्ये एकूण १४ खातेदारांच्या कर्ज खात्यामधून एकूण ३५ लाख ९ हजार ४८३ रुपयांचा अपहार केल्याचे आढळून आले. तत्कालीन बँक शाखा अधिकारी व इतर आरोपींनी संगनमत करून आदिवासी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांवर सह्या, अंगठे घेऊन त्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करून शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम न देता परस्पर कर्जाची रक्कम वाटून घेत, फसवणूक केली.

Web Title: Central Bank denies bail to accused in Rs 35 lakh scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.