केंद्रीय प्रवेश प्रक्रिया; विद्यार्थी संघटनांनी थोपटले दंड!
By Admin | Updated: May 25, 2017 01:23 IST2017-05-25T01:23:08+5:302017-05-25T01:23:08+5:30
महाविद्यालयांचा विरोध: शिक्षण विभागानेही कळविली शिक्षण संचालकांना माहिती

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया; विद्यार्थी संघटनांनी थोपटले दंड!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: माध्यमिक शिक्षण विभागाने यंदा प्रथमच शहरातील विज्ञान शाखा असलेल्या ५२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला; परंतु या निर्णयाला कनिष्ठ महाविद्यालयांकडूनच विरोध होत आहे. विशेष म्हणजे, खासगी शिकवणी संचालकांनीच केंद्रीय प्रवेश पद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. कनिष्ठ महाविद्यालयांचा केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला विरोध पाहता, शिक्षण विभागानेसुद्धा शिक्षण उपसंचालकांकडे ही माहिती कळविली असून, विद्यार्थी संघटनांनी शिक्षण विभागाच्या पाठीशी उभे राहत केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला विरोध करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या विरोधात अभाविप, एनएसयूआयने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर दरवर्षी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची विद्यार्थ्यांची झुंबड उडायची. टक्केवारी पाहून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जायचे. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्राचे २०० ते ३०० रुपये महाविद्यालये आकारायचे. महागडे प्रवेशपत्र खरेदी करूनही कमी टक्के असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेशापासून वंचित राहावे लागे. सोबतच कनिष्ठ महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांकडून भरमसाट शिक्षण शुल्कसुद्धा वसूल करायचे. त्यामुळे अभाविप, एनएसयूआयने महाविद्यालयांमधील थेट प्रवेश प्रक्रियेला विरोध करीत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीनुसार आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. दोन्ही संघटनांची ही मागणी शिक्षण विभागाने मान्य करून यंदा प्रथमच शहरामध्ये अकरावीचे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला; परंतु शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांना आर्थिक फटका बसणार असल्याने त्यांनी या प्रवेश प्रक्रियेला विरोध केला आहे. या महाविद्यालयांच्या विरोधाला शिक्षण विभागाने न जुमानता प्रवेश प्रक्रिया राबवावी. जे कनिष्ठ महाविद्यालये केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध करतील, त्यांच्याविरुद्ध अभाविप, एनएसयूआय तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा अभाविपचे महानगर मंत्री हर्षल अलकरी, सहमंत्री वसिष्ठ कात्रे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांनी दिला आहे.
विरोध कशासाठी?
शिकवणी वर्ग संचालकांनी स्वत:ची कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा उघडली आहेत. शिकवणी वर्गातील विद्यार्थी दुसरीकडे न जाता आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयात शिकावेत. शिकवणी वर्ग शुल्कासोबतच कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क, डोनेशन मिळविण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. केंद्रीय पद्धतीनुसार आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली, तर आपल्या महाविद्यालयाला शिकवणी वर्गात शिकणारे विद्यार्थी मिळणार नसल्याने, काही शिकवणी वर्ग संचालक विरोध करीत आहेत, तर काही कनिष्ठ महाविद्यालयांना यंदा आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे प्रवेशपुस्तक विक्री, डोनेशन मिळणार नसल्याने विरोध करण्यात येत आहे.
विद्यार्थी हितासाठी केंद्रीय पद्धतीने आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. स्वार्थासाठी कनिष्ठ महाविद्यालये विरोध करीत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांविरुद्ध अभाविप आंदोलन उभे करेल.
- वसिष्ठ कात्रे, महानगर सहमंत्री, अभाविप
विद्यार्थ्यांकडून आर्थिक लाभ यंदा मिळणार नसल्याने कनिष्ठ महाविद्यालय संचालक व शिकवणी वर्ग संचालक केंद्रीय आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला विरोध करीत आहे; परंतु त्यांचा विरोध विद्यार्थी हिताचा नाही. जे कनिष्ठ महाविद्यालये आॅनलाइन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतील, त्यांच्याविरुद्ध आम्ही तीव्र आंदोलन करू.
- आकाश कवडे, जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय
केंद्रीय आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात शासनाकडे परवानगी मागितली असून, कोणत्याही परिस्थितीत ही प्रक्रिया शिक्षण विभाग राबविणार आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांनी सहकार्य करावे.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी.