स्मशानभूमी, तीर्थक्षेत्र निधी खर्च वांध्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 05:07 IST2017-05-13T05:07:57+5:302017-05-13T05:07:57+5:30
५९ कामांचे २.२५ कोटी रुपये जाणार परत

स्मशानभूमी, तीर्थक्षेत्र निधी खर्च वांध्यात
सदानंद सिरसाट
अकोला : जिल्हा परिषद, नियोजन समितीच्या मंजुरी प्रक्रियेत अडकलेली जिल्ह्यातील स्मशानभूमी आणि तीर्थक्षेत्र विकासाची ५९ कामे आता थांबणार आहेत. दोन वर्षांच्या मुदतीत निधी खर्च न झाल्याने २ कोटी २२ लाख रुपये निधी शासनजमा करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागावर आली आहे. विशेष म्हणजे, हा निधी खर्च करण्यासाठी २० फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला होता.
जिल्ह्यात जनसुविधा आणि तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांसाठी २०१५-१६ मध्ये निधी देण्यात आला होता. त्यामध्ये लहान ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतींना विशेष अनुदानाच्या निधीसह तीर्थक्षेत्राचा विकास कामांसाठी निधीचा समावेश आहे. हा निधी खर्च करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नियोजन ठेवण्यात आले; मात्र जुलै २०१६ नंतर थेट २ जानेवारी २०१७ रोजीच्या नियोजन समितीच्या बैठकीतच गावांची निवड आणि कामांना निधी खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा निधी खर्च करण्यासाठी २० फेब्रुवारी २०१७ रोजी प्रशासकीय मंजुरी देत निधी वाटप केला.
त्यामध्ये १६ लहान ग्रामपंचायतींना जनसुविधांतर्गत स्मशानभूमी विकासासाठी शेड बांधकाम, सिमेंट रस्ता कामासाठी ५० लाख रुपये देण्यात आले. त्यासोबतच २३ मोठ्या ग्रामपंचायतींना जनसुविधेंतर्गत त्याच कामांसाठी ७९ लाख ६६ हजार रुपये देण्यात आले, तसेच यात्रा स्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी २० कामांना ९२ लाख ४० हजार रुपये वाटप करण्यात आले. हा निधी देतानाच संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत खर्च करण्याची अट टाकण्यात आली. निधी खर्च करण्याची दोन वर्षांची मुदत संपल्याने हा निधी शासनजमा करावाच लागणार आहे.
पालकमंत्र्यांनी मंजुरी दिलेली कामे
अनेक गावांमध्ये पावसाळ्यात स्मशानभूमीची समस्या बिकट आहे. ती मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील स्मशानभूमी आणि तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीने मान्यता दिली आहे. शासनाकडे त्यांनी पाठपुरावा केल्यास जिल्हा विकासासाठी असलेला हा निधी खर्च करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
स्मशानभूमीची कामे रखडणाऱ्या ग्रामपंचायती
जनसुविधेंतर्गत लहान आणि मोठ्या ग्रामपंचायतींना निधी देण्यात आला आहे. दोन्ही मिळून १ कोटी २९ लाख ६६ हजार रुपये एवढा निधी खर्च वांध्यात आला आहे. त्यामुळे ३९ गावांतील स्मशानभूमी विकासाची कामे रखडणार आहेत. त्यामध्ये पळसो बढे, कासमपूर (पळसो बढे), कुरणखेड-२, दहिगाव गावंडे, कौलखेड जहॉ., कानशिवणी, चिखलगाव, बाभूळगाव जहॉ., कुंभारी, उगवा, आपातापा, निंभोरा, मुंडगाव, रिधोरा, जामवसू, महान, कुरूम, हातगाव, पाथर्डी, हिवरखेड-३ कामे, पैलपाडा, पिंप्री खुर्द, चांदुर, खापरवाडी, अंबाडी, वडाळी सटवाई, वडगाव मेंढे, लामकाणी, बोराडा बोरवाकडी, घोटा, साहित, रामखेड, अंबाशी, पाचरण, दिग्रस खुर्द, वारखेड या गावांचा समावेश आहे.
तीर्थक्षेत्र विकासाची २० कामे बाधित
जिल्हा वार्षिक योजनेतून यात्रा स्थळ विकास कार्यक्रमांतर्गत २० कामांसाठी ९२ लाख ४० हजार रुपये देण्यात आले. त्या कामांसाठी पळसो बढे, कौलखेड जहॉ, हिंगणी बुद्रूक, पातूर नंदापूर, येवता, गोरेगाव बुद्रूक, वाकी, पातोंडा, ढगा, जनुना, शिंदखेड, दोनद खुर्द, मधापुरी, नेर, तळेगाव खुर्द, तळेगाव बुद्रूक, पंचगव्हाण, विवरा, आलेगाव, पास्टुल या गावांतील विविध संस्थान, आश्रम, मंदिर, विहारांची निवड करण्यात आली होती.