पॅकेजतंर्गत गायी वाटप घोटाळा !
By Admin | Updated: April 25, 2015 02:15 IST2015-04-25T02:15:35+5:302015-04-25T02:15:35+5:30
संस्थाचे पुन्हा फेरलेखा परिक्षण ; लोकमत इफेक्ट.

पॅकेजतंर्गत गायी वाटप घोटाळा !
अकोला: विदर्भातील शेतकर्यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विशेष पॅकेजांतर्गत वाटप करण्यात आलेल्या गायी वाटपात प्रचंड घोळ झाला असून, अकोला जिल्हय़ातील या घोळाची चौकशी गत सात वर्षांपासून गुलदस्त्यात होती,लोकमतने याप्रकरणी वृत्त प्रसिध्द करताच, या विषयावर मागील महिन्यात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे गायी लाभधारक संस्थाचे पुन्हा फेर लेखा परिक्षण करण्याचे आदेश पशूसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य मंत्रालयाने दिले असून, गुरू वारपासून जिल्हयातील लाभधारक संस्थाचे फेर लेखा परक्षिण सुरू करण्यात आले आहे. शेतकर्यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन केंद्रशासनाने पंतप्रधान व राज्य शासनाने विशेष मुख्यमंत्री पॅकेज दिले होते. केंद्र आणि राज्य मिळून जवळपास पावणे पाच हजार कोटींचे हे पॅकेज देण्यात आले होते. अल्पभूधारक शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यात आले होते. या पॅकेजांतर्गत शेती विकासाच्या योजनांसह शेतकर्यांना जोडधंद्यांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. विदर्भ विकास पॅकेजांतर्गत विदर्भातील ११ जिल्हय़ात प्रत्येकी एक हजार गायींचे वाटप पन्नास टक्के अनुदानावर करण्यात आले होते. पण, अनेक ठिकाणी या गायी कागदोपत्रीच वाटप करू न शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अकोला जिल्हय़ात हे वास्तव समोर आले आहे. या जिल्हय़ातील प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या सभासदांना एक हजार गायींचे वाटप करण्यात आले आहे; परंतु यातील अनेक संस्थांना कागदोपत्री गायी खरेदी केल्याचे भासवून या पॅकेजच्या अनुदानाची रक्कम अपहार केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. या संदर्भात तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी व साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (पदूम) अकोला यांनी संयुक्तरीत्या चौकशी करू न अहवाल दिला आहे. या अहवालात या जिल्हय़ात मूर्तिजापूर तालुक्यात सहा संस्थांच्या माध्यमातून ४१ गायी खरेदी केल्याच नसल्याचे चौकशीअंती आढळून आले असल्याचे म्हटले आहे. तसेच बाश्रीटाकळी तालुक्यातील तीन सहकारी संस्थांच्या माध्यमातून २६ गायी खरेदी केल्या नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील एका संस्थेने नऊ गायी खरेदी केल्या नसल्याचे म्हटले आहे. आकोट तालुक्यातील एका संस्थेच्या पाच गायीही खरेदी केल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.