सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: January 17, 2015 01:26 IST2015-01-17T01:26:46+5:302015-01-17T01:26:46+5:30
मोरझाडीतील आत्महत्या प्रकरण.
_ns.jpg)
सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
उरळ (अकोला): नजीकच्या मोरझाडी येथील सामूहिक विष प्राशनाच्या प्रकरणात उपचराअंती वाचलेल्या मुलाच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी गावातील सात जणांविरुद्ध शुक्रवारी संगनमत करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मोरझाडी येथील अनिल बाबाराव मोरखडे (५७), रेखा अनिल मोरखडे (४५), धीरज अनिल मोरखडे (२0), आधार ऊर्फ सूरज अनिल मोरखडे (१८) आणि प्रीती अनिल मोरखडे (१५) यांनी १ जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या शेतामध्ये रोगर नामक विषारी औषध प्राशन केले. यातील रेखा अनिल मोरखडे यांचा २ जानेवारीला, अनिल मोरखडे यांचा ४ जानेवारी रोजी आणि त्यांचा धाकटा मुलगा आधार याचा ७ जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. धीरज आणि त्याची धाकटी बहीण प्रीती यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊन मृत्यूच्या दाढेतून त्यांची सुटका झाली. या प्रकरणी धीरजने शुक्रवारी उरळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गावातील हरिश्चंद्र पांडुरंग मोरखडे, देवका हरिश्चंद्र मोरखडे, मीनाबाई हरिश्चंद्र मोरखडे, दिगांबर देविदास मोरखडे, संगीता दिगांबर मोरखडे, देविदास पांडुरंग मोरखडे, चंद्रप्रभा देविदास मोरखडे या सात जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३0६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
धीरजने उरळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार , तो व त्याच्या कुटुंबीयांना गावातील उपरोक्त लोकांनी ह्यतुम्हाला गावात राहू देत नाहीह्ण, असे सांगून व त्यांची बदनामी करून अतोनात त्रास दिला. या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांनी विष प्राशन केले होते. अनिल मोरखडे, रेखा मोरखडे व आधार मोरखडे यांच्या मृत्यूस उपरोक्त लोक कारणीभूत असल्याचे धीरजने फिर्यादीत नमूद केले. या प्रकरणी ठाणेदार पी. के. काटकर हे तपास करीत असून, अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. तथापि, आरोपींना आपण लवकरच अटक करू, अशी माहिती ठाणेदार काटकर यांनी प्रस्तुत वार्ताहराला दिली.
ह्यत्याह्ण चिठ्ठीचे रहस्य कायमच
मोरखडे कुटुंबीयाच्या विष प्राशनानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मीणा यांनी मोरझाडी येथे भेट देऊन घराची झडती घेतली होती. तेथे एक चिठ्ठी आढळून आली होती. त्या चिठ्ठीत काय लिहिलेले होते, त्याबाबत पोलिसांनी मौन पाळले होते. आता या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतरही त्या चिठ्ठीचे रहस्य कायमच आहे, हे विशेष.