३५ लाख रुपयांच्या रोकडसह कार जप्त!

By Admin | Updated: December 17, 2015 02:26 IST2015-12-17T02:26:10+5:302015-12-17T02:26:10+5:30

तिघांना अटक, चौथा आरोपी फरार; तिघांची जामिनावर सुटका.

Car seized with cash of Rs 35 lakh! | ३५ लाख रुपयांच्या रोकडसह कार जप्त!

३५ लाख रुपयांच्या रोकडसह कार जप्त!

अकोला: रेल्वे स्टेशन चौक परिसरातून संशयास्पदरीत्या फिरणार्‍या कारला मंगळवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान रामदासपेठ पोलिसांनी अडवून, कारची तपासणी केली असता, त्यामध्ये ३५ लाख रुपयांची रोकड मिळून आली. पोलिसांनी कारमधील तिघांना अटक करून त्यांच्याकडील रोकड व कार जप्त केली. चौथा आरोपी मात्र फरार झाला. पोलिसांनी सायंकाळी तिघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. मंगळवारी रात्रीदरम्यान पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. ऑपरेशनदरम्यान रात्री २ वाजताच्या सुमारास रामदासपेठ पोलिसांना रेल्वे स्टेशन परिसरातून एमएच ४३ ए. 0२१३ क्रमांकाची कार फिरताना दिसून आली. पोलिसांनी ही कार अडविली आणि कारमधील व्यक्तींची चौकशी करण्यास सुरुवात केली. कारमधील व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेण्यास प्रारंभ केला. कारच्या मागील डिक्कीची तपासणी केल्यावर पोलिसांना त्यात नोटांचे बंडल दिसून आल्याने, पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी कार आणि कारमध्ये बसलेल्यांना ठाण्यात चलण्यास म्हटले. दरम्यान, कारमधील चौथा आरोपी फरार झाला. पोलिसांनी कार पोलीस ठाण्यात आणली. पोलिसांनी कारच्या डिक्कीतून नोटांचे बंडल जप्त केले. यात एक हजार रुपयांच्या नोटांचे ९ बंडल, ५00 रुपयांच्या नोटांचे ५२ बंडल, अशी एकूण ३५ लाख रुपयांची रोकड मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईतील वेरूळ येथील गणेश राऊत म्हात्रे (३८), धनाजी धावू तांडेल (३८) आणि गजानन रामदास वानखेडे (४६) यांना अटक केली. पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तर हा पैसा आणण्यात आला नाही ना, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. तिघांच्या चौकशीदरम्यान, त्यांनी वाशिम येथील खरात नामक व्यक्तीने त्यांना वाशिम व अकोला येथे प्लॉट खरेदीसाठी बोलाविल्याची माहिती दिली. प्लॉट खरेदीसाठी आपण ही रक्कम सोबत आणल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिघाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका केली.

Web Title: Car seized with cash of Rs 35 lakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.