एलबीटीचुकारांच्या शोधासाठी मोहीम
By Admin | Updated: May 3, 2015 02:15 IST2015-05-03T02:15:36+5:302015-05-03T02:15:36+5:30
नवीन बांधकामांवर विशेष लक्ष

एलबीटीचुकारांच्या शोधासाठी मोहीम
अकोला: महानगर पालिकेच्या हद्दीत येत असलेल्या तसेच स्थानिक संस्था कराचा भरणा न केलेल्या नवीन बांधकामधारकांची तपास मोहीम मनपाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी शुक्रवारी स् थानिक संस्था कर विभागाच्या कर्मचार्यांसोबत गीतानगर व वाशिम बायपासस्थित नवीन बांधकामांची पाहणी करून संस्था कराचा भरणा न केलेल्यांना आपला थकीत कर भरण्याचा आदेश दिला. मनपा आयुक्तांनी गीतानगर येथील हरीश भोजवाणी, गोविंद अग्रवाल, मधुसुदन भुतडा, वाशिम बायपासस्थित आसिफ खां मुस्तफा खां व किल्ला चौकस्थित राजेश भारती यांच्या नवीन बांधकामांची पाहणी केली व त्यांना थकीत कर भरण्याचा आदेश दिला. कर न भरल्यास दंडात्मक कार्यवाही करण्याचा आदेशही त्यांनी दिला. या व्यतिरिक्त मनपा नगर रचना विभागाची परवानगी असलेल्या बांधकामधारकांकडून १ पट स्थानिक संस्था कर व अशा प्रकारची परवानगी नसलेल्या बांधकामधारकांकडून ५ पट शास्तीसह स्थानिक संस्था कर वसूल करण्यात यावा. तसेच नवीन बांधकामधारकांनी ३ दिवसांच्या आत स्थानिक संस्था करांचा भरणा करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त शेटे यांनी दिला आहे. यावेळी स्थानिक संस्था कर विभागाचे गजानन मुर्तळकर, नगर रचनाचे संदीप गावंडे, स्वीय साहाय्यक जितेंद्र तिवारी, दिलीप जाधव, सुधीर माल्टे, संतोष नायडू, उमेश सटवाले, संतोष सूर्यवंशी, देवेंद्र भोजने, गणेश टाले, शंकर शर्मा, विष्णू राठोड, मंगेश जाधव, राजू मिसुरकर, विजय हेडाऊ आदींचा सहभाग होता.