पांढरे बिबे घ्या, घरात धन येईल...असे म्हणणाऱ्या मांत्रिकाला दिले पैसे!

By नितिन गव्हाळे | Updated: August 9, 2023 16:41 IST2023-08-09T16:39:54+5:302023-08-09T16:41:49+5:30

निवृत्ती बोळेने स्वत:च्याच लुटीचा बनाव रचल्याचे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासात समोर आले.

Buy white bibes, money will come to the house...paid to the sorcerer who said that! | पांढरे बिबे घ्या, घरात धन येईल...असे म्हणणाऱ्या मांत्रिकाला दिले पैसे!

पांढरे बिबे घ्या, घरात धन येईल...असे म्हणणाऱ्या मांत्रिकाला दिले पैसे!

अकोला : कान्हेरी सरप येथील नर्सिंगचा विद्यार्थी निवृत्ती महादेव बोळे याने मित्राकडून उसने घेतलेले पैसे परत करण्याऐवजी, त्याला एका मांत्रिकाने पांढरे बिबे घेतले तर घरात धन येईल, असे सांगितले. त्याने मांत्रिकाला पैसे दिले खरे. परंतु मांत्रिकाने त्याला पांढरे बिबे दिले नाही. बिबेही मिळाले नाहीत. पैसेही गेले. आता मित्राचे पैसे कसे द्यावे. या विवंचनेत सापडलेल्या निवृत्ती बोळेने स्वत:च्याच लुटीचा बनाव रचल्याचे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासात समोर आले.

निवृत्ती बोळे याने अमरावती येथील मित्राकडून २५ हजार रुपये उसने घेतले होते. ते त्याला परत देण्यासाठी म्हणून त्याने बँकेतून काढलेले २५ हजार व जवळ असलेले ७ हजार ५०० रु. असे ३२ हजार ५०० रुपये घेऊन दुचाकीने जात असताना दोनद बु. व दोनद खु. दरम्यान असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ एका महिलेसह अनोळखी व्यक्तीने आपल्याला हात दाखवून थांबवून लुटल्याची तक्रार पिंजर पोलिस ठाण्यात दिली होती. घटनेची गांभीर्य लक्षात घेता, स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला असता, निवृत्ती बोळे याला कोणीही लुटले नसून, त्याने बनाव रचल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, काही दिवसांपूर्वी त्याला एक मांत्रिक भेटला होता. मांत्रिकाने त्याला पांढऱ्या बिब्यांबाबत सांगितले आणि हे पांढरे बिबे घेतले तर घरात धन येईल. अशा भूलथाप दिली. त्याला निवृत्ती बळी पडला. मित्राकडून उसने घेतलेले २५ हजार परत देण्यासाठी बँकेतून पैसे काढले. स्वत:कडील ७,५०० रुपये असे ३२ हजार रुपये त्याने पांढरे बिबे घेण्यासाठी त्या मांत्रिकाला दिले. परंतु त्या मांत्रिकाने पांढरे बिबे न देता, त्याच्याकडील पैसे घेऊन पोबारा केला. आता मित्राचे पैसे कसे द्यावे? अशा विवंचनेत तो सापडला. यातून सुटण्यासाठी त्याने लुटल्याचा बनाव रचला आणि तोच बनाव त्याच्यावर उलटल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले.

बिबेही नाही मिळाले, पैसेही गेले!

निवृत्ती बोळे याने आपल्या वैयक्तिक कामात पैसे खर्च झाल्याची बाब लपविण्यासाठी जबरीने पैसे हिसकल्याची खोटी तक्रार दिल्याची कबुली दिली. त्याने पैसे खर्च कुठे केले. याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने घेतला असता, त्याने अमरावती जिल्ह्यातील माउली जहागीर या ठिकाणी पांढरे बिबे घेण्यासाठी एका मांत्रिकाला रक्कम दिल्याचे सांगितले. परंतु मांत्रिक पांढरे बिबे न देताच, पैसे घेऊनही पसार झाल्याचे समोर आले. या प्रकरणात पिंजर पोलिसांनी निवृत्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.

Web Title: Buy white bibes, money will come to the house...paid to the sorcerer who said that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला