विद्युत साहित्य चोरणा-या टोळीचा पर्दाफाश
By Admin | Updated: March 17, 2016 02:37 IST2016-03-17T02:37:54+5:302016-03-17T02:37:54+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; विद्युत साहित्य हस्तगत.

विद्युत साहित्य चोरणा-या टोळीचा पर्दाफाश
अकोला : शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणांवरून विद्युत साहित्य चोरणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी पर्दाफाश केला. या टोळीतील तीन सदस्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून विद्युत साहित्य हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
जिल्हय़ात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विद्युत साहित्य चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जिल्हय़ातील पोलीस स्टेशनचा आढावा घेतल्यानंतर विद्युत साहित्याची मोठय़ा प्रमाणात चोरी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरून पोलीस अधीक्षक मीणा यांनी विद्युत साहित्य चोरीचे प्रमाण वाढल्यावर नाराजी व्यक्त करीत या गुन्हय़ाचा तपास तातडीने स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख जितेंद्र सोनवने यांच्याकडे दिला. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने विद्युत साहित्य चोरी करणार्या टोळीचा शोध घेतला असून, या टोळीतील तीन सदस्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये दहीहांडा येथील रहिवासी इम्रान अली शहादत अली, रेल येथील रहिवासी नजीर खान मनसब खान व चिचारी येथील रहिवासी अय्याज खान युसूफ खान या तिघांना अटक करण्यात आली आहे.
या तीनही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तीनही आरोपींना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.