अकोला: एसटी बसमध्ये बसलेल्या प्रवाशाला मँगो फ्रुटीतून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध करून दीड लाख रुपयांनी लुटल्याची घटना शुक्रवारी समोर आली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.मालेगाव तालुक्यातील माळेगाव येथील राहणारे प्रभाकर काशीराम गुठे (६0) यांच्या तक्रारीनुसार २0 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी ते अकोला नवीन बसस्थानकावर आले. या ठिकाणावरून ते एमएच २0-बीएम-३६0८ क्रमांकाच्या उदगीर-शेगाव या एसटी बसगाडीमध्ये बसले. काही अंतरावर बसगाडी गेल्यानंतर त्यांच्या मागच्या सीटवर एक अनोळखी व्यक्ती बसला. या व्यक्तीने तोंडावर रुमाल झटकला आणि त्यांना मॅन्गो फ्रुटी प्यायला दिली. काही वेळाने प्रभाकर गुठे यांना गुंगी आल्याने, ते झोपी गेले. दरम्यान, चोरट्याने त्यांच्या बोटांमध्ये ५0 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, २0 ग्रॅमचा सोन्याची साखळी, खिशातील रोख २0 हजार रुपये आणि मोबाइल असा एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून चोरटा पसार झाला.बसगाडीमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यामुळे कंडक्टरने त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यामुळे कुटुंबीयांनी प्रभाकर गुठे यांना बेशुद्ध अवस्थेतच अकोल्यातील खासगी रुग्णालयात भरती केले. शुद्धीवर आल्यावर त्यांना चोरट्याने लुटल्याचे कळले. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
एसटी बसमध्ये प्रवाशाला बेशुद्ध करून लुटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:21 IST