बुरखाधारी कापडचोर महिला जेरबंद
By Admin | Updated: March 13, 2016 01:56 IST2016-03-13T01:56:18+5:302016-03-13T01:56:18+5:30
सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई, ऑटोचा पाठलाग केल्यानंतर चोरी उघड.

बुरखाधारी कापडचोर महिला जेरबंद
अकोला - शहरातील महागड्या कापड दुकानांमध्ये क ापड खरेदी-विक्रीच्या बहान्याने जाऊन कापड चोरी करणार्या तीन बुरखाधारी महिला व त्यांच्या ऑटोचालक साथीदारास शनिवारी अटक करण्यात आली. सीसी कॅमेर्याने टिपलेल्या ऑटोरिक्षाच्या क्रमांकावरून सिटी कोतवाली पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून चोर महिलांना जेरबंद केले. एका महिला आरोपीच्या घरातून सुमारे ५0 हजार रुपयांचे कापड जप्त करण्यात आले आहेत.
पोळा चौकातील रहिवासी फातमा बी सै. नजीर (५५), रशीद बी. शेख दिवान (४२) व शबनम बी. मोहम्मद रफीक या तीन महिला शुक्रवारी सायंकाळी संघवी वाडीसमोर असलेल्या आशीर्वाद साडीज् या शोरुममध्ये साडी खरेदीसाठी गेल्या. साडी खरेदी न करता या महिलांनी साड्यांची पाहणी केली. त्यानंतर काही वेळातच त्या निघून गेल्या. यावेळी तीनही महिलांनी दुकानमालक राजू दयाचंद अग्रवाल व दुकानातील सेल्स गर्लची नजर चुक वून दोन महागड्या साड्या लंपास केल्या. हा प्रकार राजू अग्रवाल यांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांना महिलांवर संशय आला. त्यांनी शोरुममधील सीसी फुटेज तपासले असता, महिलांनी बुरख्यामध्ये साड्या चोरल्याचे स्पष्ट झाले; मात्र बुरख्यामध्ये पूर्ण चेहरा झाकलेला असल्याने त्यांना महिला नेमक्या कोण आहेत, हे दिसले नाही. त्यानंतर त्यांनी दुकानाबाहेर असलेल्या सीसी फुटेजची तपासणी केली असता, तीनही महिला या खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी अ. आरीफ अ. रफीक याच्या एम एच ३0 पी ९२५९ क्रमांकाच्या ऑटोमध्ये बसताना दिसल्या. यावरून त्यांनी ऑटो क्रमांकासह सीसी फुटेज सीटी कोतवाली पोलिसांना दिले. पोलिसांनी चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला असता, या महिला त्याच ऑटोमध्ये बसून अलंकार मार्केटमध्ये जाताना पोलिसांना दिसले. यावरून पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून तीनही महिलांसह ऑटोचालकास अटक केली. यामधील फातमा बी सै नजीर हीच्या घराची झडती घेतली असता, तिच्या घरातून सुमारे ५0 हजार रुपयांच्या साड्या, जिन्स पॅन्ट, शर्टसह कापड पोलिसांनी जप्त केले. बुरखाधारी महिलांनी शहरातील अनेक दुकान मालकांना असा गंडा घातला असून, त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.