कौटुंबिक वादातून पत्नी व चिमुकलीस जाळले
By Admin | Updated: December 26, 2014 01:26 IST2014-12-26T01:26:53+5:302014-12-26T01:26:53+5:30
पती व चार दिरांचे क्रूर कर्म.

कौटुंबिक वादातून पत्नी व चिमुकलीस जाळले
अकोला: कौटुंबिक वादातून पत्नी व दोन वर्षीय चिमुकल्या मुलीस रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना गुरुवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास भगतवाडीतील नुरी प्लॉटमध्ये घडली. दोघी माय-लेकी गंभीर जळाल्या असून, त्यांच्यावर सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी पतीसह चार दिरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
डाबकी रोड पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल हसन खान यांना रूबिना परवीन अब्दुल मजिद (२४) हिने दिलेल्या जबानी तक्रारीनुसार, तिचा पती अब्दुल मजिद अब्दुल रफिक याच्यासोबत कौटुंबिक वाद होता. या वादातूनच रूबिना ही काही महिन्यांपासून तिच्या दोन वर्षीय मुलीसह माहेरी राहत होती. गुरुवारी ती भगतवाडीतील नुरी प्लॉटमधील तिच्या घरी आली आणि तिने पती अब्दुल मजिद याला माहेरकडील माझे सर्व सामान आणते आणि येथे राहते, असे म्हटले. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला.
पती अब्दुल मजिद याने तिला अश्लील शिवीगाळ केली आणि तिला मारहाण केली. त्यानंतर पती अब्दुल मजिद, तिचे दीर अब्दुल मुजिद अब्दुल रफिक, अब्दुल आसिफ अब्दुल रफिक, अब्दुल सादिद अब्दुल रफिक आणि अब्दुल वहिद अब्दुल रफिक यांनी रूबिना हिच्या अंगावर कॅनमधील रॉकेल ओतले आणि तिला पेटवून दिले. यात रूबिना ही गंभीररित्या भाजली. तिला तातडीने सर्वोपचार रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रात्री उशिरा डाबकी रोड पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. तिच्या जबाबावरून आरोपींवर पोलिसांनी भादंवि कलम ३0७(३४) नुसार गुन्हा दाखल केले.
*चिमुकलीची प्रकृती चिंताजनक
चिमुकल्या मुलीला जाळल्यानंतर ती जागीच बेशुद्ध झाली. तिला व तिच्या आईला पोलिसांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. आई रूबिना शुद्धीवर होती. तिने पोलिसांनी बयाणसुद्धा घेतले. रुबिनाची दोन वर्षीय चिमुकल्या मुलीची प्रकृती मात्र गंभीर आहे. ती शुद्धीवर नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
*चिमुकलीवर रॉकेल ओततानाही नराधमांना फुटला नाही पाझर
रूबिनाचा पती व तिच्या चार दिरांनी अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. रूबिना आक्रोश करीत असताना, तिच्या चिमुकल्या मुलीनेही गलाबला केला. तिला आवाज ती देत होती. सुडाने पेटलेल्या नराधमांनी रूबिनाला पेटविल्यानंतर तिच्या चिमुकल्या मुलीला लक्ष्य गेले. त्यांनी तिच्या अंगावरही रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. निरागस, निष्पाप चिमुकल्या मुलीला पेटवून देतानाही तिचा पिता व काकांचे हात जराही थरारले नाहीत, ना त्यांच्या हृदयाला पाझर फुटला. हा प्रकार समाजातील माणुसकी हरवत असल्याचे उदाहरण आहे.