बुलडाणा जिल्हा परिषदेत युती-आघाडी कायम

By Admin | Updated: October 5, 2014 01:04 IST2014-10-05T00:44:42+5:302014-10-05T01:04:42+5:30

सभापती पदांच्या निवडणुकीत काँग्रेस-राकाँचेच वर्चस्व; आचारसंहितेनंतर मिळणार पदे.

In Buldhana Zilla Parishad the alliance continued | बुलडाणा जिल्हा परिषदेत युती-आघाडी कायम

बुलडाणा जिल्हा परिषदेत युती-आघाडी कायम

बुलडाणा : विधानसभेच्या रणधुमाळीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सेना व भाजपा हे स्वबळावर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीत मात्र युती आणि आघाडी कायमच असल्याचे चित्र आज झालेल्या मतदानातून समोर आले आहे.
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांसाठी आज जि.प.च्या शिवाजी सभागृहात मतदान घेण्यात आले. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी ३९ विरुद्ध १६ म तांनी विजय मिळवित आघाडीचेच वर्चस्व कायम ठेवले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उ पविभागीय अधिकारी खान्दे यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक झाली. ५९ सदस्यसंख्या असलेल्या सभागृहामध्ये काँग्रेस-राकाँच्या उमेदवारांना ३९ मते मिळाली, तर सेनेच्या उमेदवारांना १६ मते मिळाली. अपक्ष सदस्य बाळासाहेब दराडे, राष्ट्रवादीच्या सविता बाहेकर, अँड. सुमित सरदार व मनसेचे विनोद वाघ गैरहजर होते. सेनेच्या स्वाती शिंगणे, स्नेहल पाटील, तर भाजपाचे श्याम पठाडे व अरुणा सुलताने यांना १६ मतांवर समाधान मानावे लागले.

* काँग्रेसचे अंकुश वाघ व गणेश बस्सी विजयी
विषय समिती सभापती पदांपैकी काँग्रेसच्या वाट्याला दोन पदे आली आहेत. अंकुश वाघ, तर गणेश बस्सी यांनी ३९ मते घेऊन या निवडणुकीत विजय मिळविला. वाघ यांना बांधकाम सभापती, तर बस्सी यांना समाजकल्याण सभापती पद दिले जाणार आहे.

* मोताळा तालुक्यात दोन सभापती पदे
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गणेश बस्सी व सुलोचना पाटील यांना सभापती पदाची संधी दिल्यामुळे मोताळा तालुक्यात दोन सभापती पदे मिळाली आहेत. जिल्हा काँग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, माजी जिल्हाध्यक्ष श्याम उमाळकर, संजय राठोड यांच्या उपस्थितीत बस्सी व वाघ यांचा सत्कार करण्यात आला.

* राष्ट्रवादीमध्ये महिला राज
राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी सुलोचना शरदचंद्र पाटील व आशाताई झोरे यांना उमेदवारी दिली. या दोघींनाही प्रत्येकी ३९ मते मिळाली. पाटील यांना कृषी तर झोरे यांना महिला व बालकल्याण सभापती पद दिले जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळीही या पदांसाठी महिला सदस्यांनाच राष्ट्रवादीने संधी दिली होती. पाटील या मोताळा तालुक्यातील तालखेड जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य असून, झोरे या लोणार तालुक्यातील सुलतानपूर जिल्हा परिषद सर्कलमधून विजयी झाल्या आहेत.

Web Title: In Buldhana Zilla Parishad the alliance continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.