बुलडाणा जिल्हा परिषदेवर आघाडीचा झेंडा कायम
By Admin | Updated: September 22, 2014 00:40 IST2014-09-22T00:40:35+5:302014-09-22T00:40:35+5:30
अध्यक्षपदी काँग्रेसच्या खंडारे, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे खेडेकर.

बुलडाणा जिल्हा परिषदेवर आघाडीचा झेंडा कायम
बुलडाणा : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून असलेला काँग्रेसचा दबदबा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही कायम राहिला आहे. रविवारी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अलका चित्रांगण खंडारे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग खेडेकर यांची निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात ही निवडणूक पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अलका खंडारे तर शिवसेनेकडून अशोक इंगळे यांनी तसेच उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग खेडेकर व शिवसेनेचे विलास चनखोरे यांनी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ४२ मते मिळाली तर भाजप-सेनेला प्र त्येकी १४ मतांवर समाधान मानावे लागले. भाजप-सेना युतीचे तीन सदस्य गैरहजर होते.
** शांततेत निवड
जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड ही अतिशय चुरशीची होत आली आहे. यावेळी मात्र ही निवडणूक अतिशय शांततेत पार पडली. आघाडीची संयुक्त बैठक आज सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी काँग्रेसकडून निरीक्षक म्हणून जालन्याचे आर.आर. खडके, तर राष्ट्रवादीकडून वाशिमचे पांडुरंग ठाकरे हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या खंडारे व राष्ट्रवादीकडून पांडुरंग खेडेकर यांचे नाव समोर आले व टाळ्यांच्या गजरात अनुमोदन देण्यात आले. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सर्व सदस्यांसोबत चर्चा केली होती.
** काँग्रेसकडून जल्लोषात स्वागत
काँग्रेसच्या अलका खंडारे यांची निवड झाल्यानंतर जिल्हा परिषदेपासून तर जिल्हा काँग्रेस कमेटीपर्यंत वाजतगाजत रॅली काढण्यात आली. यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, आमदार दिलीपकुमार सानंदा, लक्ष्मणराव घुमरे, समाधान हेलोडे आदींच्या उपस्थितीत अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.