बुलडाणा, मोताळा होणार वाय-फाय!

By Admin | Updated: March 21, 2016 01:41 IST2016-03-21T01:41:06+5:302016-03-21T01:41:06+5:30

गुढीपाडव्याला शुभारंभ; सपकाळ यांची अभिनव भेट.

Buldana, Motala to be Wi-Fi! | बुलडाणा, मोताळा होणार वाय-फाय!

बुलडाणा, मोताळा होणार वाय-फाय!

बुलडाणा: एकविसाव्या शतकातील माहिती व दूरसंचार क्रांतीला सामोरे जाताना आजच्या तरुणाईमध्ये प्रचंड आकर्षण असलेल्या इंटरनेट सुविधेचा मोफत लाभ लवकरच बुलडाणा व मोताळा येथील नागरिकांना मिळणार आहे. तळहातावर येऊन ठेपलेला स्मार्ट फोन आज सामाजिक विकासात मोलाचे योगदान देऊ शकतो, या संकल्पनेतून आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावतीने ही मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.
आज डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र व ई-माध्यमांच्या चर्चेचा फड सर्वत्र रंगतो; मात्र त्याची खरी ओळख प्रत्यक्ष लाभ मिळाल्यानंतरच कळू शकते. तसे तर मोफत वाय-फाय हे बुलडाणेकरांसाठी स्वप्नवतच! पण हे स्वप्न मराठी नूतन वर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला प्रत्यक्षात उतरणार आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा व मोताळा या दोन्ही नगरांमध्ये महत्त्वपूर्ण ठिकाणी मोफत वाय-फाय हॉटस्पॉट उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाने सदर प्रस्तावास विशेष मान्यता प्रदान केली आहे. बुलडाणा, मोताळा या दोन नगरांबरोबरच बुलडाणा मतदारसंघातील ३९ ग्रामपंचायतींनासुद्धा ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर योजना ही तीन वर्षे कालावधीसाठी प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे ६0 लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. यासंदर्भात बोलताना आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अर्मत्य सेन यांनी दारिद्रय़निर्मूलन व मानव विकास निर्देशांकाच्या वाढीसाठी सामान्य व्यक्ती हा जगाशी जोडला जाणे अपरिहार्य असल्याचे नमूद केले आहे. स्व.राजीव गांधी यांनी आणलेला पीसीओ आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीची मुहूर्तमेढ करणारा ठरला होता. त्यामुळे वाय-फाय सुविधा ही नागरी सुविधेचा एक आवश्यक भाग झाल्यामुळे विकासाच्या संकल्पनेला अनुसरून प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचे आ. सपकाळ यांनी सांगितले.

Web Title: Buldana, Motala to be Wi-Fi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.