बाळापुर : तामसी येथे वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका मजुराचा गळा आवळून खुन केल्याची घटना सोमवार, १८ मार्च रोजी घडली. प्रमोद शालीग्राम मेसरे (३२ रा. तुलंगा) असे मृतकाचे नाव आहे. बाळापूर पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार प्रमोद मेसरे हा तामसी येथे वीटभट्टीवर मजूर म्हणून कामावर होता. सोमवार, १८ मार्च रोजी तो त्याच्या झोपडीत निपचित पडलेला असल्याची माहिती त्याचे तांदळी येथे राहणारे भाऊ ज्ञानेश्वर शालिग्राम मेसरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने तामसी गाठून प्रमोद मेसरेला अकोला येथे रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यावर अंत्यविधी पार पडला. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मंगळवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालात प्रमोदचा मृत्यू हा गळा आवळल्याने श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचा उल्लेख आहे. त्यावरून बाळापूर पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार अनील जुमळे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरिक्षक पंकज कांबळे करीत आहेत.