लाचखोर संस्था उपाध्यक्ष गजाआड
By Admin | Updated: June 14, 2014 23:29 IST2014-06-14T22:38:47+5:302014-06-14T23:29:33+5:30
शाळेच्या शिपायामार्फत पाच लाख रूपयांची लाच मागणार्या अकोल्यातील एका शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षाविरूद्ध शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी गुन्हा दाखल केला.

लाचखोर संस्था उपाध्यक्ष गजाआड
अकोला: शाळेतून सेवानवृत्त झालेल्या लिपिकाचा सेवानवृत्ती वेतन व भविष्यनिर्वाह निधीचा प्रस्ताव संस्थेमार्फत शिक्षणाधिकार्यांकडे पाठविण्यासाठी शाळेच्या शिपायामार्फत पाच लाख रूपयांची लाच मागणार्या अकोल्यातील एका शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षाविरूद्ध शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील तक्रारदार सुनिल ठोंबरे (काल्पनिक नाव) हे अकोल्यातील गोरक्षण रोडवरील सहकार नगरातील विदर्भ ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते. सप्टेंबर २0१२ मध्ये ते सेवानवृत्त झाले. ठोंबरे यांना पेंशन व भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळाला नसल्याने त्यांनी अकोला कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे विनंती अर्ज केला होता; परंतू प्राचार्यांनी त्यांना संस्थेचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार २ महिन्यांपूर्वीच ते संदीप पाटील यांना भेटले आणि त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. संदीप पाटील यांनी त्यांना पेंशन व भविष्यनिर्वाह निधीचा प्रस्ताव संस्थेमार्फत शिक्षणाधिकार्यांकडे पाठविण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी केली. ही रक्कम डी.आर. पाटील विद्यालयाचे शिपाई दीपक गोपनारायण यांच्याकडे देण्यास त्यांनी सांगितले. ठोंबरे यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी शाळा परिसरात सापळा लावला. ठोंबरे पाच लाख रूपयांची रक्कम घेवून १२ जून रोजी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास शाळेत गेले. संस्थेच्या कार्यालयात गेल्यानंतर संस्था उपाध्यक्ष संदीप पाटील यांना संशय आल्याने, त्यांनी दीपक गोपनारायण याला ठोंबरे यांची अंगझडती घेण्यास सांगितले. अंगझडती घेतल्यानंतर दोघांनी अंधाराचा फायदा घेवून तेथून पळ काढला. शुक्रवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही आरोपींविरूद्ध कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ सह कलम ३९२, २0१(३४) नुसार गुन्हा दाखल केला.
** पाच लाख द्या, नाही तर दोन दुकाने नावावर करा
पेंशन व भविष्यनिर्वाह निधीचा प्रस्तावासाठी पाच लाख रुपयांची लाच द्या, नाही तर गोरक्षण रोडवरील मुलाच्या नावे असलेली दोन दुकाने नावावर करण्याची मागणी संदीप पाटील याने तक्रारदाराकडे केली होती; परंतु तक्रारदाराने दुकाने नावावर करून देण्याविषयी असर्मथता दर्शविली आणि रोख पाच लाख रुपये देण्याचे मान्य केले.
** लाचेची रक्कम देण्यासाठी दुकाने ठेवली गहाण
लाचखोर संदीप पाटील याला पाच लाख रुपयांची रक्कम देण्यासाठी तक्रारदाराने गोरक्षण रोड भागातील दोन दुकाने अडीच लाख रुपयांमध्ये गहाण ठेवली आणि उर्वरित अडीच लाख रुपयांची रक्कम नातेवाइकांकडून गोळा केली होती.
** एसीबीचे डिजीटल व्हॉईस रेकॉर्डरही पळविले
ठोंबरे हे पाच लाख रूपये घेवून गेल्यानंतर उपाध्यक्ष पाटील यांना संशय आला आणि त्यांनी शिपाई दीपक गोपनारायण यास त्यांची अंगझडती घेण्यास सांगितले. तक्रारदाराची अंगझडती घेतल्यानंतर त्यांना त्याच्याजवळ डिजीटल व्हॉईस रेकॉर्डर आढळले. दोघाही आरोपींनी त्यांच्याजवळील रेकॉर्डर हिसकावून पळ काढला.
** शिपाईही गजाआड
संस्थेचे उपाध्यक्ष संदीप पाटील याने लाचेची रोख शिपाई दीपक गोपनारायण याच्याकडे देण्यास सांगितले होते. परंतू संदीप पाटील दीपक गोपनारायणला संशय आल्याने दोघे पळून गेले. पोलिसांनी रात्री उशिरा संदीप पाटील याच्यासह दीपक गोपनारायण याला अटक केली.
** संस्था उपाध्यक्षाच्या घराची झडती
संस्थेचा उपाध्यक्ष संदीप पाटील याच्या घराची एसीबी अधिकार्यांनी शुक्रवारी रात्री झडती घेतली. दरम्यान त्याच्या घरात काहीच आढळून आले नाही. मात्र, त्याचे चार ते पाच बँकामध्ये खाते आहेत. येवता येथे ४५ एकर जमीन आणि काही भुखंड एवढी संपत्ती असल्याचे एसीबीच्या अधिकार्यांनी सांगितले.