लाचखोर ग्रामसेवकाची कारागृहात रवानगी
By Admin | Updated: November 15, 2014 00:23 IST2014-11-15T00:23:57+5:302014-11-15T00:23:57+5:30
कंचनपूर येथील ग्रामसेवकाचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
_ns.jpg)
लाचखोर ग्रामसेवकाची कारागृहात रवानगी
अकोला: गाव नमुना आठ अ चा दाखला देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक शिवदास महादेव गवई (३२) याला शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने शिवदास गवई याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. दुसर्या प्रकरणामध्ये न्यायालयाने आकोट येथील लाचखोर मंडळ निरीक्षक नंदकिशोर पवार आणि सुनील सामतकर यांची जामिनावर सुटका केली. कंचनपूर येथील ग्रामसेवक शिवदास उर्फ शिवा गवई याला तक्रारकर्त्याकडून गाव नमुना आठ चा दाखला देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक पतसंस्था देवरावबाबा चाळ येथे एसीबीने गुरुवारी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी पोलिसांनी गवईला प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. गवई याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता; परंतु त्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. आकोट येथील मंडळ अधिकारी नंदकिशोर पवार व सुनील सामतकर यांनी तक्रारकर्त्यास अकृषक अहवालासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार एसीबीने दोघांविरुद्ध आकोट येथे गुन्हा दाखल केला होता.