हाडांचे कर्दनकाळ गतिरोधक
By Admin | Updated: November 24, 2014 01:26 IST2014-11-24T01:23:55+5:302014-11-24T01:26:06+5:30
अकोला शहरात जीवघेणे गतिरोधक; कथित रस्तासुरक्षेसाठी मणक्यांच्या आजारास निमंत्रण.

हाडांचे कर्दनकाळ गतिरोधक
विवेक चांदूरकर / अकोला
रस्त्यांची झालेली दुदर्शा, त्यावर पडलेले खड्डे, नाली, वीज घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे त्यातच मनपा व बांधकाम विभागाने बांधलेले अधिकृत गतिरोधक, यामुळे अकोलावासीयांची हाडे पुरती खिळखिळी होत आहेत. गतिरोधकाने हाडे फ्रॅक्चर होत असल्याने वाहनचालकांची शारीरिक व आर्थिक हानी होत आहे.
खड्डय़ांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोला शहरात रस्त्यांची चाळणी झाली आहे. त्यातच असलेल्या गतिरोधकांमुळे हाडांच्या आजारांचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. दररोज वाहन चालविताना आपण अनेक गतिरोधकांवरून जातो, त्यावेळी हे गतिरोधक आपल्या आरोग्यास घातक असून, यामुळे मणक्याचे आजार होत असल्याची कल्पनाही आपल्याला नसते. मात्र, शहरात असलेल्या गतिरोधकांमुळे पाठीच्या मणक्यांसह हाडांचे आजार जाणवत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या रुग्णालयात आपआपल्या स्तरावर उपचार करीत असल्यामुळे हाडाच्या आजारांचे प्रमाण अवाढव्य असले तरी ते समोर येत नाही. गतिरोधकांमुळे मात्र शहरातील हजारो नागरिक बाधित आहेत.
वाहनांचा वेग कमी व्हावा, या उद्देशाने बांधण्यात येत असलेले ग ितरोधक चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी बांधण्यात येत असल्यामुळे फायद्याचे कमी नुकसानदायी जास्त ठरत आहेत.
शहरात अनेक अनावश्यक गतिरोधक आहेत. या ग ितरोधकांची उंची किती असावी, ते कोणत्या ठिकाणी असावे व कशाप्रकारचे असावे, यासंबंधीच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता हे गतिरोधक बांधण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांना मणक्यांचे आजार होत आहेत. ज्या नागरिकांच्या हाडांमध्ये कॅल्शियम कमी असते, त्यांना गतिरोधकावरून वाहन गेल्यावर झटका बसला तर हाडात फ्रॅक्चर होतो. याचा उपचार करण्याकरि ता नागरिकांना हजारो रुपये खर्च करावा लागत असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश देशमुख यांनी स्पष्ट केले.