निधी अभावी स्थापत्य अभियंत्यांच्या नियुक्तीला ‘ब्रेक’
By Admin | Updated: February 14, 2015 01:32 IST2015-02-14T01:32:55+5:302015-02-14T01:32:55+5:30
राज्यातील १५६ उमेदवार वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत.

निधी अभावी स्थापत्य अभियंत्यांच्या नियुक्तीला ‘ब्रेक’
मनोज भिवगडे/अकोला:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २0१३ साली घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी स्थापत्य सेवा परीक्षेतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील १५६ उत्तीर्ण उमेदवार सर्व सोपस्कार पार पाडूनही वर्षभरापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे एकाच वेळी तीन विभागासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेतील उतीर्ण उमेदवारांना सर्वाजनिक बांधकाम व जलसंपदा विभागातर्फे नियुक्ती देण्यात आली असताना, पाणी पुरवठा व स्वच्छा विभागातर्फे निधीचे कारण पुढे करीत उमेदवारांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २0१३ मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी स्थापत्य सेवा परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २0१३ रोजी राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या चार केंद्रावर घेण्यात आली होती. यात साहाय्यक अभियंत्याचे (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ८0 , जलसंपदा विभागासाठी ७५९ आणि पाणीपुरवठा विभागासाठी १५८ पदांचा समावेश होता. मुख्य परीक्षा आटोपल्यानंतर २९ मार्च २0१४ रोजी लोकसेवा आयोगातर्फे निकाल घोषित करण्यात आला. गुणवत्ता यादीनुसार प्रत्येक विभागासाठी आवश्यक पदांएवढय़ा उतीर्ण उमेदवारांची शिफारस करण्यात आली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने उमेदवारांना नियुक्ती दिली. त्यानंतर जलसंपदा विभागातील उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न विधानसभेत गाजला. अखेर या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन्ही विभागातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असली तरी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने मात्र निधी अभावी १५६ उमेदवारांना वर्ष उलटले तरी नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवले आहे.
*मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वर्षभरापासून नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. लोकसेवा आयोगाने सर्व सोपस्कार उरकून पाणीपुरवठा विभागाकडे १५६ उमेदवारांची शिफारस केली. त्यामुळे आता पुढचे सोपस्कार या विभागाला पूर्ण करावयाचे होते. या विभागाकडे निवड झालेल्या उमेदवारांनी विचारणा केली असा त्यांना असामाधानकारक उत्तर मिळाले. त्यामुळे मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतच्या कार्यालयाचे उंबरठे उमेदवारांनी झिजविले. ३ फेब्रुवारी रोजी उमेदवारांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले.
*प्रधान सचिवांना दिले चौकशीचे आदेश
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे उतीर्ण उमेदवारांनी त्यांची कैफियत मांडली. आपले सरकार या संकेत स्थळाच्या माध्यमातूनही उतीर्ण विद्यार्थ्यांनी त्यांची तक्रार शासनाकडे पाठविली; परंतु त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळाले नाही. याबाबत मंत्र्यांकडे विचारणा केली असता उमेदवारांच्या नियुक्तीबाबत कुठे अडचणी आल्यात याबाबत चौकशी करण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.