‘बॉटलनेक’ हटविणार
By Admin | Updated: May 30, 2017 02:16 IST2017-05-30T02:16:54+5:302017-05-30T02:16:54+5:30
गोरक्षण रोड : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

‘बॉटलनेक’ हटविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील गोरक्षण रोडवरील नेहरू पार्क ते शुभम मंगल कार्यालयापर्यत रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावरील अतिक्रमण महिनाभरात हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी महानगरपालिका प्रशासनाला दिले.या आदेशामुळे गोरक्षण रोडवरील ‘बॉटलनेक’ हटविला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने या संदर्भात सतत पाठपुरावा केला आहे.
अकोल्यातील रस्ते विकास कामांत गोरक्षण रोड कामाच्या पहिल्या टप्प्यात नेहरू पार्क ते शुभम मंगल कार्यालयापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यानुषंगाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्रीराम पटोकार उपस्थित होते. गोरक्षण रस्त्याच्या कामासाठी भागवत हॉस्पिटल ते महावितरण कार्यालयापर्यंत रस्त्यावरील पक्या अतिक्रमणामुळे बॉटलनेक तयार झाला होता. हे अतिक्रमण महिनाभरात काढून, रस्ता मोकळा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला यावेळी दिले. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.