फसवणूकप्रकरणी दोघांना सक्तमजुरी
By Admin | Updated: September 18, 2015 00:57 IST2015-09-18T00:57:04+5:302015-09-18T00:57:04+5:30
आकोट येथील न्यायालयाने ठोठावली बनावट दस्तावेज तयार करून जागा हडपल्याप्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा.
_ns.jpg)
फसवणूकप्रकरणी दोघांना सक्तमजुरी
आकोट: वेडसर इसमाचा गैरफायदा घेत संगनमत करून बनावट दस्तावेज तयार करणे, या दस्तावेजांच्या आधारे वेडसर इसमाच्या नावे असलेली जागा हडपून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली १६ सप्टेंबर रोजी एका आरोपी महिलेसह दोघांना न्यायाधीश सु.ह. वानखडे यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यासंदर्भात स्थानिक जिनगरवाडी येथील लीलाबाई नागरे या महिलेने न्यायालयात तक्रार दिली होती. त्या तक्रारीमध्ये सुखराम नेमाडे हा वेडसर असून, त्याची ती पालनकर्ता आहे. सुखराम नेमाडे वेडसर असल्याचा फायदा घेत आरोपी चंद्रकांत वासुदेव किल्लेदार व हेमलता नागोराव वारे यांनी संगनमताने सुखरामच्या मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्या आधारावर तालुका भूमी अभिलेख कार्यालयात वारसाच्या नोंदी करून घेतल्या व या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याच्या नावावर असलेली जागा नावावर करून घेण्याचा फसवणुकीचा प्रकार केला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून आकोट पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन ठाणेदार सुभाष माकोडे व एएसआय साहेबराव भगत यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणी न्यायाधीश वानखडे यांच्या न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर आरोपी चंद्रकांत किल्लेदार व हेमलता वारे या दोघांवर आरोप सिद्ध झाल्याने न्यायाधीशांनी त्या दोघांना प्रत्येकी दोन वर्ष सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अँड. महेंद्र व्यास यांनी काम पाहिले. तर पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत खांडेकर यांनी न्यायालयाचे कामकाज पाहिले.