पोलिसांवर दगडफेक करणारे दोघे जेरबंद
By Admin | Updated: July 20, 2016 01:31 IST2016-07-20T01:31:24+5:302016-07-20T01:31:24+5:30
पोलिसांवर दगडफेक करणा-या दोन आरोपींना अटक; आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी.

पोलिसांवर दगडफेक करणारे दोघे जेरबंद
अकोला: हरिहरपेठेतील चांदखॉ प्लॉट येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दगडफेक करणार्या दोन आरोपींना जुने शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. साजिद राजा खान सलीम रजा खान व जावेद खान जाकीर खान अशी दोन आरोपींची नावे आहेत.
चांदखॉ प्लॉट परिसरातील रहिवासी सुरेश नवलकार याने यथेच्छ मद्यप्राशन करून चांदखॉ प्लॉटमधील इच्छा चहाच्या टपरीवर आला. त्यानंतर काही जणांशी वाद घालून त्याने त्या ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य करीत परिसरातील नागरिकांनाही अश्लील शिवीगाळ केली. तो दारू प्यायला असल्याने नागरिकांनी त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनीही त्याची समजूत काढल्यानंतर हा वाद मिटविण्यात आला; मात्र काही वेळातच या परिसरातील समाजकंटकांनी या दारुड्याच्या वक्तव्याचा बाऊ करीत थेट पोलिसांवरच दगडफेक केली. या दगडफेकीत अख्तर आणि ठाकूर हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी काही समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये साजिद राजा खान सलीम रजा खान व जावेद खान जाकीर खान या दोघांचा समावेश आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध जुने शहर पोलिसांकडून घेण्यात येत आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.