प्रवास भत्त्याच्या देयकासाठी लाच मागणारे दोघे जेरबंद
By Admin | Updated: August 25, 2016 01:58 IST2016-08-25T01:58:17+5:302016-08-25T01:58:17+5:30
मूर्तिजापूर पंचायत समितीमधील कर्मचा-याने मागीतली लाच.

प्रवास भत्त्याच्या देयकासाठी लाच मागणारे दोघे जेरबंद
मूर्तिजापूर (जि. अकोला), दि. २४ : एका कर्मचार्याला त्याच्या प्रवास भत्त्याची रक्कम देण्यासाठी लाच मागणार्या सहा. लेखाधिकारी व कनिष्ठ सहायकास बुधवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून जेरबंद केले. अवघ्या ६५00 रुपयांसाठी मूर्तिजापूर पं. स. अंतर्गत येणार्या या दोघांनी तक्रारदाराची अडवणूक केली होती.
याबाबत प्राप्त माहिती अशी, की तक्रारदाराचे कार्यालयीन प्रवास भत्त्याचे ४४ हजार रुपयांचे देयक काढायचे होते. या देयकासाठी पं. स. मूर्तिजापूर येथील सहा. लेखाधिकारी अरविंद डाखोरे यांनी तक्रारदाराला आधी २0 टक्के रकमेची लाच मागितली. याबाबत संबंधित तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून एसीबीच्या अधिकार्यांनी सापळा रचला. २0 टक्के रक्कम लाच म्हणून मागणार्या डाखोरे यांनी नंतर १५ टक्के रकमेवर तडजोड केली. त्यानंतर पुन्हा ६५00 रु. रकमेवर तडजोड केली. पीएचसी जामठी येथील कनिष्ठ सहाय्यक योगेश कुलकर्णी यांची भेट घेतली असता त्यांनी पण ६५00 रु. द्यावे लागतील, असे सांगून डाखोरे यांचे कॅबिनमध्ये नेले. कुलकर्णी यांनी लाचेची रक्कम डाखोरे यांचेकडे देण्यास सांगितले. त्यावरून डाखोरे यांनी लाचेची रक्कम ६५00 रु. स्वीकारले. त्यांना रंगेहात पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.