बोगस बंगाली डॉक्टरचा पर्दाफाश
By Admin | Updated: May 19, 2017 00:58 IST2017-05-19T00:58:19+5:302017-05-19T00:58:19+5:30
अकोला: वैद्यकीय व्यवसाय करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका बंगाली डॉक्टरचा रुग्णालय तपासणी पथकाने गुरुवार, १८ मे रोजी पर्दाफाश केला.

बोगस बंगाली डॉक्टरचा पर्दाफाश
अकोला: वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध पदवी किंवा पात्रता नसतानाही गत दहा वर्षांपासून बाळापूर तालुक्यातील वाडेगाव व परिसरात वैद्यकीय व्यवसाय करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका बंगाली डॉक्टरचा रुग्णालय तपासणी पथकाने गुरुवार, १८ मे रोजी पर्दाफाश केला. असित बरुन हलदार असे या बोगस डॉक्टरचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील आहे. त्याच्याकडे अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची कोणतीही वैध पदवी नसतानाही तो सर्रासपणे अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करीत असल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले.राज्य शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात रुग्णालय तपासणी मोहीम सुरू आहे. सदर मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. वाडेगाव येथील साईबाबा क्लिनिक चालविणाऱ्या डॉ. हलदार हे पात्र पदवी नसतानाही अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करीत असल्याची तक्रार १०४ या टोल फ्री क्रमांकावर करण्यात आली होती.
या तक्रारीची दखल घेत विशेष पथकाने गुरुवारी सकाळीच वाडेगाव गाठले. यावेळी डॉ. हलदार यांच्या क्लिनिकमध्ये डमी रुग्ण पाठवून मूळव्याधीवर उपचार करण्याबाबत बोलणी झाली. उपचारासाठी हलदार यांनी ७,५०० रुपये खर्च सांगितला. आठ ते दहा दिवसात उपचार पूर्ण होईल व एक दिवसाआड ड्रेसिंगला यावे लागेल. उपचार शुल्क तीन हप्त्यांमध्ये द्यावे लागेल, अशी बोलणी झाली. यानंतर डमी रुग्ण म्हणून गेलेल्या पथकातील सदस्याने इतर सदस्यांना बोलावून घेतले. यावेळी पथकाने हलदार यांच्या क्लिनिकची तपासणी केली असता, अॅलोपॅथी औषधी साठा, २ कात्र्या, कपडे शिवण्याची मोठी सुई, हायड्रोजन पॅराक्साईड आदी साहित्य आढळून आले. तपासणी पथकाने हे साहित्य व हलदार यांचे शैक्षणिक कागदपत्र व रुग्णांची नोंदवही जप्त करून ताब्यात घेतले. ही कारवाई बाळापूरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भावना हाडोळे, वाडेगाव चौकीचे कॉन्स्टेबल इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील उमेश ताठे, संदीप घाटोळ, गायकी यांनी केली. जप्त केलेला औषध साठा व साहित्य अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला