‘त्या’ मुलाचा मृतदेह सापडला!
By Admin | Updated: June 17, 2017 01:30 IST2017-06-17T01:30:40+5:302017-06-17T01:30:40+5:30
मूर्तिजापूर शहरातील घटना: एका बालकाला वाचविण्यात यश

‘त्या’ मुलाचा मृतदेह सापडला!
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : १५ जून रोजी मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील जुनी वस्ती परिसरातील नाल्याला आलेल्या पुरात दोन चिमुकले वाहून गेले होते. घटनेची माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने बालकाचा शोध सुरू केला होता. अखेर १२ तासांनी त्या बालकाचा मृतदेह १६ जून रोजी सकाळच्या सुमारास सिरसो येथील नाल्यामध्ये सापडला. एका बालकाला काही अंतरावर नागरिकांनी वाचवले. १५ जूनच्या सायंकाळी ५.१५ ते ६.१५ च्या दरम्यान शहरात मुसळधार पाऊस झाला. पाऊस थांबल्यानंतर जुनी वस्ती परिसरातील खाटीक पुऱ्यातील नाल्यावर वाहणाऱ्या पाण्याचा आनंद लुटत असताना दोन मुले वाहून गेली होती. त्यांपैकी एका मुलाला हजारीवाडीजवळ वाचविण्यात आले. दुसरा मुलगा मात्र वाहून गेला. त्या मुलाचे नाव मो. साद मो. रफीक असे आहे. घटनेची माहिती मिळताच शासनाचे प्रतिनिधी व आपत्कालीन पथकाने घटनास्थळ गाठून रात्रीच्या १२ वाजेपर्यंत शोधकार्य सुरू ठेवले.
नाल्यातील झाडेझुडुपे व आढळून येणारे साप यामुळे मृतकाच्या नातेवाइकांनी शोधकार्य थांबवायला लावले. त्यानंतर आज सकाळीच नव्याने शोधकार्य सुरू केले असता सिरसो येथील पारधी वस्तीजवळ मो. सादचा मृतदेह आढळून आला. आपत्कालीन पथकाने मृतदेह बाहेर काढले.