वडिलांच्या तेरवीऐवजी राबविला रक्तदानाचा उपक्रम
By Admin | Updated: April 27, 2015 01:37 IST2015-04-27T01:37:55+5:302015-04-27T01:37:55+5:30
रुढी, परंपरेला फाटा देत अकोला शहरातील राठी कुटुंबाचा असाही पुढाकार

वडिलांच्या तेरवीऐवजी राबविला रक्तदानाचा उपक्रम
अकोला: रूढी, परंपरेच्या फेर्यातून माणसाचे मरण सुटलेले नाही. रूढी, परंपरेनुसार तेरवी, गोडजेवण, पूजापाठ, शांतीपाठ वगैरेसारखे कार्यक्रम घेतले, तर मृतक व्यक्तीला सद्गती मिळते, असा समज भारतीय समाजमनात आहे. परंतु खोलेश्वरातील राठी कुटुंबाने रूढी, परंपरेला बाजूला सारत ज्येष्ठ समाजसेवी स्व. लीलाधर राठी यांच्या तेरवीऐवजी गरजू रुग्णांसाठी रक्तदानाचा उपक्रम घेऊन समाजासमोर एकप्रकारे आदर्शच निर्माण केला. समाजामध्ये अनेक सकारात्मक बाबी घडताना दिसून येत आहेत. मरणोत्तर देहदान, नेत्रदानासारखे उपक्रम राबविले असताना, आपण वडिलांच्या निधनानंतर त्यांचे देहदान किंवा नेत्रदान करू शकलो नाही. याची खंत स्व. प्रा. लीलाधर राठी यांचे चिरंजीव प्रशांत व सुशांत राठी यांना वाटत होती. प्रशांत राठी हे रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य असल्याने, त्यांनी रूढी, परंपरांना बाजूला सारत, वडिलांच्या तेरवीच्या दिवशी रक्तदानासारखा उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला. माहेश्वरी युवा संघटनेच्या सहकार्याने त्यांनी २0 एप्रिल रोजी माहेश्वरी भवन येथे वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदानाचा कार्यक्रम घेतला. प्रशांत यांचा मुलगा प्रसन्न राठी याने सर्वप्रथम रक्तदान केले. तसेच राठी कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळींनीही रक्तदान केले आणि रक्ताच्या २५ पिशव्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या स्वाधीन केल्या. राठी कुटुंबाने वडिलांच्या तेरवीच्या दिवशी गरजू रुग्णांसाठी रक्तदान करून एक प्रेरणादायी सुरुवात करून समाजासमोर एकप्रकारे आदर्शच निर्माण केला.