आंधळ्या शेतक-याची डोळस शेती

By Admin | Updated: November 23, 2015 01:03 IST2015-11-23T01:03:53+5:302015-11-23T01:03:53+5:30

दोन्ही डोळ्यांना अंधत्व आल्यावरही नशिबापुढे हार न मानता, उत्कृष्ट शेती करून भरघोस उत्पादन घेण्याचा शेतक-याचा विक्रम.

Blind Farmer's Eye Agriculture | आंधळ्या शेतक-याची डोळस शेती

आंधळ्या शेतक-याची डोळस शेती

महादेव जउळकर/ अनसिंग (जि. वाशिम): जन्मत: दोन्ही डोळ्यांना अंधत्व आल्यावरही नशिबापुढे हार न मानता, उत्कृष्ट शेती करून भरघोस उत्पादन घेण्याचा विक्रम येथील संजय दुधाट या शेतकर्‍याने केला आहे. भाजीपाल्याचे लाखो रुपयांचे उत्पादन घेण्याबाबत दुधाट यांनी परिसरातील शेतकर्‍यांनाही मागे टाकले असून, दररोज शेतात जाऊन तेथील कामे स्वत: करण्याची किमया ते लिलया पार पाडतात.
जन्मत:च आंधळे असल्याने संजय दुधाट यांनी पोकाळी या गावातील वसंतराव नाईक अंध विद्यालयात ब्रेल लिपीतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अनसिंगला राहून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी त्यांना वणवण भटकंती करावी लागली. अनेक ठिकाणी जाऊन मुलाखती दिल्या; परंतु पाच वर्षे मेहनत घेऊनसुद्धा शासकीय नोकरी मिळू शकली नाही. पण त्यामुळे संजयने हताश झाला नाही. दरम्यान, वडिलांनी त्याचा विवाह चिवरा येथील मुलीशी करून दिला. आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी संजयने शेती करण्याचे ठरविले. संजयवर दोन मुले व पत्नी यांची जबाबदारी पडली. त्यानंतर त्यांनी दुसर्‍यांवर अवलंबून न राहता वडिलोपाजिर्त मिळालेल्या शेतीमध्ये स्वत: कष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वडिलोपार्जित गावाजवळ असलेल्या अडीच एकर शेतामध्ये जाऊन स्वत: उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.
संजय दुधाट हे घरापासून तर शेतात दररोज कुणाचीही मदत न घेता एकटेच जातात. शेतात गेल्यावर मजुरांकडून शेती करून घेतात तसेच शेतात भावाने धरणावरून पाइपलाइन करून दिल्यामुळे सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. शेतात काम करीत असताना काही दिवस त्यांचे मोठे बंधू कैलास दुधाट व संजयची पत्नी यांनी त्यांना मदत करुन शेतीबाबत माहिती दिली. शेतीबाबत माहिती घेतल्यानंतर ते स्प्रिंकलरने पाणी देऊन भाजीपाला उत्पादन तसेच ओलिताची शेती करीत आहेत. संजय दुधाट यांनी अंधत्वावर मात करून शेतात हरभरा, तूर, सोयाबीन अशा पिकांतूनही लाखो रुपये मिळवत आपला संसार सुखाचा केला आहे.

Web Title: Blind Farmer's Eye Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.