वेगळा विदर्भ करण्याची क्षमता भाजपमध्येच!
By Admin | Updated: March 15, 2016 02:30 IST2016-03-15T02:30:30+5:302016-03-15T02:30:30+5:30
दोन-तीन वर्षात होईल वेगळा विदर्भ, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष दत्ता मेघे यांचा दावा.

वेगळा विदर्भ करण्याची क्षमता भाजपमध्येच!
अकोला: अनेक वर्षांपासून वेगळय़ा विदर्भाची मागणी होत आहे; परंतु अनेक राजकीय पक्षांचा त्याला विरोध आहे. केवळ भाजपनेच त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वेगळय़ा विदर्भाबाबत ठराव पारित केला होता. वेगळा विदर्भ निर्माण करण्याची ताकद केवळ भाजपातच असून, येत्या दोन ते तीन वर्षांंमध्ये विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकते, असे मत माजी खासदार व विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे अध्यक्ष दत्ता मेघे यांनी येथे व्यक्त केले.
विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी माजी खासदार दत्ता मेघे हे सोमवारी अकोल्यात आले होते. यावेळी पत्रकारांसोबत त्यांनी चर्चा केली. वेगळय़ा विदर्भाची मागणी फार जुनी आहे. अनेकांनी वेगळय़ा विदर्भासाठी आंदोलन केले; परंतु त्याला यश मिळाले नाही. मीसुद्धा वेगळय़ा विदर्भ राज्याविषयी अनेकदा भूमिका मांडली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेस पक्षासोबतच शिवसेना, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही विदर्भ राज्य निर्माण करण्यास विरोध करीत आहे. विदर्भाच्या जनतेला स्वतंत्र राज्य हवे असेल, तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात दत्ता मेघे म्हणाले, की तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. हिंसाचार करण्यात आला. छत्तीसगड राज्यातील जनतेने मात्र वेगळय़ा राज्यासाठी कोणतेही आंदोलन केले नाही; तरीही छत्तीसगड राज्याची निर्मिती त्यावेळी करण्यात आली. विदर्भाच्या बाबतीत हेच तत्त्व लागू पडते. विदर्भातील जनता अहिंसावादी आहे. त्यामुळे येथील जनता विदर्भ राज्यासाठी तीव्र आंदोलन करताना दिसत नाही. याचा अर्थ असा होत नाही, की विदर्भाच्या जनतेला वेगळे राज्य नको आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा त्याची ध्येयधोरणे दृष्टीसमोर ठेवून काम करतो; परंतु भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भ राज्याच्या निर्मितीचा मुद्दा ठेवला होता आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत भाजपने वेगळय़ा विदर्भाचा ठराव पारितही केला. त्यामुळे वेगळय़ा विदर्भाची निर्मिती भाजपशिवाय दुसरा कोणताही पक्ष करू शकत नाही, असे स्पष्ट मत माजी खासदार दत्ता मेघे यांनी येथे मांडले. पत्रपरिषदेला माजी आमदार डॉ. जगन्नाथ ढोणे, भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी महापौर अश्विनी हातवळणे, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, विष्णू मेहरे, विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय उजवणे, धनंजय नालट आदी उपस्थित होते.
जनमत घेण्याची गरज
येथील जनतेला विदर्भ राज्य नको आहे, असे कोणीही गृहित धरू नये. हिंसेच्या मार्गातून कधीही काही मिळत नाही. शांततेच्या मार्गानेच विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकते. केंद्र सरकारने विदर्भात जनमत चाचणी घ्यावी. जनतेने विदर्भाच्या बाजूने मतदान केले तर सरकारला विदर्भ राज्याची निर्मिती करावीच लागेल, असे माजी खासदार दत्ता मेघे यांनी सांगितले.