स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडून चाचपणी!
By Admin | Updated: September 1, 2014 21:51 IST2014-09-01T21:51:55+5:302014-09-01T21:51:55+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा तिढा वाढतच आहे.

स्वबळावर लढण्यासाठी भाजपकडून चाचपणी!
अकोला- विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा तिढा वाढतच आहे. अशातच भाजपने १४४ जागांवर दावा केल्याने महायुतीत संघर्ष पेटला आहे. एकूणच परिस्थितीमध्ये भाजपने राज्यातील सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टिकोणातून चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी जूनपासून आतापर्यंत तीन वेळा सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपकडून सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत सेनेच्या मतदारसंघांमध्येही भाजपचा सक्षम उमेदवार कोण असू शकतो, याची चाचपणीही करण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात १९९0 पासून भाजप आणि शिवसेना यांच्यात युती आहे. २00९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११९ तर शिवसेनेन १६९ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी भाजपने ४६ तर शिवसेनेने ४५ जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीनंतर पुढच्या पाच वर्षात भाजपने राज्यात त्यांचे बळ वाढविले. अकोला जिल्ह्यात केवळ शहरापुरता र्मयादित असा ठपका असलेल्या भाजपने २0१३ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत ११ जागा मिळविल्यात. अकोला पंचायत समितीवर शिवसेनेच्या मदतीने झेंडा फडकविला. त्यापूर्वी जिल्ह्यात भाजपचे केवळ ४ जिल्हा परिषद सदस्य होते. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राज्यात भाजपचा वरचष्मा राहिला. भाजपने २३ तर शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळविला. हाच धागा पकडून आता भाजपने राज्यात १४४ जागांवर दावा केला आहे. अर्थातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रातील प्रमुख मंत्र्यांपैकी एक असलेले नितीन गडकरी यांनी जाहीरपणे केलेल्या या वक्तव्यामुळे भाजप ५0 टक्के जागांवर कायम राहणार हे स्पष्ट आहे. याच मुद्यावरून शेवटच्या क्षणी महायुती तुटल्यास पूर्वतयारी म्हणून भाजपने २८८ जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केली आहे. विद्यमान आमदारांपैकी ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशा आमदारांसोबतच जे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात नाहीत, अशा मतदारसंघांमध्येही भाजपचा कोणता उमेदवार सक्षम असू शकतो, या दृष्टिकोणातून तीन-तीन वेळा चाचपणी करण्यात आली आहे.
** युती तुटल्यास फायदा कुणाला?
विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांना बाजुला ठेवून निवडणूक लढविल्यास होणार्या मत विभाजनाचा फायदा कुणाला होईल, याबाबतही भाजपकडून चाचपणी करण्यात आली. शिवसेनेला बाजूला ठेवून निवडणूक लढविल्यास भाजपला किती तोटा होईल आणि प्रतिस्पर्धी पक्षांना त्याचा किती फायदा होऊ शकेल, या दृष्टिकोणातूनही चाचपणी करण्यात आली.
** सेनेच्या संपर्कप्रमुखांना महायुतीची आशा!
भाजपने २८८ जागांवर उमेदवारांची चाचपणी केल्याच्या पृष्ठभूमीवर शिवसेनेची भूमिका काय राहील, हे जाणून घेण्यासाठी पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महायुती कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाचे बळ जाणून घेण्यासाठी सर्व्हे करण्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. जागा वाटपाचा निर्णय चर्चेतून घेतला जाईल, असे रावते म्हणाले.
** जिल्ह्यातील दोन्ही आमदारांबाबत नकारात्मक सूर
राज्यातील भाजपच्या आमदारांची त्यांच्या गत पाच वर्षातील कामांच्या आधारावर चाचपणी करण्यात आली. त्यांच्या मतदारसंघातून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये आमदारांबाबत मतदारांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्व्हेत करण्यात आला. त्यात अकोला जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही आमदारांबाबत नकारात्मक सूर उमटला. तिकीट वाटप करताना या बाबींचा विचार होणार आहे. अशा स्थितीत अकोला पश्चिममधून आ. गोवर्धन शर्मा यांच्या ज्येष्ठतेचा आणि सलग चार वेळा निवडून आल्याच्या मुद्याचा पक्षस्तरावर कितपत गांभीर्याने विचार केला जातो हे स्पष्ट होईलच; मात्र मूर्तिजापूरमधून आ. हरीश पिंपळे यांना भाजप पुन्हा मैदानात उतरविण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.