मास्क वाटपासोबतच गरजूंना बिस्कीट व पाण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:34 IST2021-02-28T04:34:35+5:302021-02-28T04:34:35+5:30
वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम, कारवाईचा नव्हे तर मानव सेवेचा प्रयत्न अकोला : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दुपारी तीन ...

मास्क वाटपासोबतच गरजूंना बिस्कीट व पाण्याची सुविधा
वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम, कारवाईचा नव्हे तर मानव सेवेचा प्रयत्न
अकोला : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दुपारी तीन वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे, त्यामुळे तीन वाजेनंतर दुकाने बंद होत असल्याने गरजूंना पाणी तसेच बिस्कीट वाटपाची सुविधा वाहतूक शाखा प्रमुख गजानन शेळके यांनी सुरू केली आहे. बाहेरगावचे नागरिक व गरजवंतांसाठी दुपारी तीन वाजेनंतर गरजवंतांना बिस्कीटचे वितरण करीत आहेत. दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्यासोबतच गरजवंतांना मानव सेवाही देत असल्याचे यावरून समोर येत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या जिल्हाभर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हाभर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरासह जिल्ह्यात संचारबंदी असल्याने दुपारी तीन वाजेनंतर अकोला शहरातील किराणा दुकान आस्थापना, बिस्कीट तसेच पाण्याची बॉटल विक्री करणारी दुकाने बंद होतात. त्यामुळे बाहेरगावावरून येणारे व काही गरजवंतांना चहा, नाश्ता किंवा पाण्याचीही सुविधा उपलब्ध होत नसल्याचे रस्त्यावर 24 तास कडा पहारा देणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. हा प्रकार वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांना कळताच त्यांनी चौकाचौकात उभे असलेल्या वाहतूक पोलिसांजवळ दुपारी तीन वाजेनंतर पाण्याच्या बाटल्यांची सुविधा केली तसेच गरजवंतांसाठी बिस्कीटही उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरातील बहुतांश मंदिरासमोर असलेले भिकारी तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना पाण्याची सुविधा नसल्याने वाहतूक पोलीस त्यांना पाण्याच्या बॉटल वाटप करीत असल्याचे दिसून येत आहे. कारवाईचा धडाका ज्या प्रमाणात सुरू आहे त्या उलट मानव सेवा ही वाहतूक पोलिसांनी प्रथमच सुरू केली आहे. यावरून नागरिकांचा खरा मित्र पोलीस असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक शाखेचे शाखेने सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत असून त्यांना पाणी बॉटल व बिस्कीट वाटप करण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.
जिल्हा प्रशासनाने पारित केलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी शहर वाहतूक शाखा करीत आहे; परंतु फक्त गुन्हे दाखल करून व दंडात्मक कारवाया करूनच जनजागृती होणार नाही तर गरीब व गरजू लोकांची मजबुरी ओळखून पोलीस हा जनतेचा मित्र असल्याची खरी ओळख करून देण्याची ही योग्य वेळ असल्याने शहर वाहतूक शाखा पोलीस सेवेसोबतच मानव सेवेचे कर्तव्य पार पाडत आहे.
-गजानन शेळके
प्रमुख वाहतूक शाखा, अकोला