काटेपूर्णा अभयारण्यात पक्ष्यांचा स्वच्छंद विहार
By Admin | Updated: January 14, 2015 01:09 IST2015-01-14T01:09:57+5:302015-01-14T01:09:57+5:30
वन आणि वन्यजीव विभागाच्या चमूने केले पक्षिनिरीक्षण.

काटेपूर्णा अभयारण्यात पक्ष्यांचा स्वच्छंद विहार
राम देशपांडे / अकोला
दरवर्षी हिवाळय़ात जिल्ह्यातील पाणवठय़ांवर विविध आकर्षक पक्षी जमा होतात. काटेपूर्णा अभयारण्यातील पाणवठय़ांवरदेखील यंदा विविधरंगी पक्षी स्वच्छंद विहार करीत आहेत. अकोला वन आणि वन्यजीव विभागाच्यावतीने एका चमूने रविवार, ११ जानेवारी रोजी काटेपूर्णा अभयारण्यातील पक्ष्यांचे निरीक्षण केले. या निरीक्षणादरम्यान चमूला ६५ पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी आढळले.
धरणातील जलाशयावर आणि काठावर स्वच्छंद विहार करणार्या पक्ष्यांच्या अनेक जाती या ठिकाणी पाहावयास मिळत असल्याने काटेपूर्णा वन आणि वन्यजीव विभागाने एक चमू तयार करून रविवारी पहाटे ५ पासून पक्षिनिरीक्षणाला प्रारंभ केला. चमूला शेकट्या, गायबगळा, टिटवी, कार्डा बगळा, वंचक, धाकला पाणकावळा, उघड्या चोचीचा करकोचा, खंड्या आणि बंड्या, चिखल्या, धोबी, वेडा राघू, तकाचोर, सुतार पक्षी, कस्तुरी, पाणबदक, सुरई, चिमणी, पिपिट, लहान पाणकावळा, पोपट, भिंगरी, कबूतर, ठिपकेदार घुबड, वटवट्या, चंडोल, घार, गरुड, टाचणी, दयाळ, लालबुड्या बुलबुल अशा विविध आकार, प्रकार आणि रंगांच्या पक्ष्यांचे दर्शन झाले.