भाऊसाहेब फुंडकरांचे खामगाव, शेगावात जंगी स्वागत
By Admin | Updated: July 11, 2016 03:17 IST2016-07-11T03:17:29+5:302016-07-11T03:17:29+5:30
शेगाव येथे आगमन होताच त्यांनी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले.

भाऊसाहेब फुंडकरांचे खामगाव, शेगावात जंगी स्वागत
खामगाव : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शेगाव व खामगाव येथे सोमवारी आगमन होताच कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे दोन्ही ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. शेगाव येथे आगमन होताच त्यांनी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी विदर्भातील भाजपा पदाधिकार्यांनी शेगाव तसेच खामगावात उपस्थित राहून ना. भाऊसाहेब फुंडकर यांचा सत्कार केला. दिवसभर पावसाची संततधार सुरू असताना मोठय़ा संख्येने कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शेगाव तसेच खामगावात चौकाचौकांत ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे विविध मंडळ, सामाजिक संस्था, अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी आदींनी स्वागत केले. शेगाव ते खामगावदरम्यान गावागावांत स्वागत करण्यात आले. शेगावात मिरवणूक निघाली असता आ.डॉ. संजय कुटे हे सुद्धा ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या वाहनात न बसता कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झाले होते. खामगाव येथील मिरवणुकीत ना. भाऊसाहेब फुंडकर यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान दोन ठिकाणी ना. भाऊसाहेब फुंडकर यांची लाडुतुला करण्यात आली. खामगाव शहरात दुपारी सुरू झालेली मिरवणूक संध्याकाळपर्यंत सुरू होती. दिवसभर संततधार सुरू असतानाही कार्यकर्ते उत्साहाने मिरवणुकीत मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
विकास आराखड्याला मूर्त स्वरूप देणार-फुंडकर
शेगावचा विकास व्हावा यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न केले आहेत. आराखड्याची सुरुवातही मीच केली आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना संतनगरीत विकास आराखडा राबविण्याची सर्वप्रथम विधान परिषदेच्या सभागृहात मागणी केली . त्यावेळी त्याला मान्यताही मिळाली . मात्र त्यानंतर हा आराखडा रखडला असून, त्याची किंमतही वाढली आहे. विकास आराखड्याला गती देऊन तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी मी स्वीकारली असून आता हा विकास आराखडा गतीने पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी पत्र परिषदेत व्यक्त केला.