भारिपला फटका, शिवसेनेचा सफाया!
By Admin | Updated: October 20, 2014 02:01 IST2014-10-20T02:01:52+5:302014-10-20T02:01:52+5:30
अकोला जिल्ह्यात काँग्रेस, राकाँची पाटी जिल्ह्यात कोरीच; पाचपैकी चार जागा एकट्या भाजपला.

भारिपला फटका, शिवसेनेचा सफाया!
अकोला : मोदी लाटेवर स्वार होत भाजपने अकोला जिल्ह्यात मुसंडी घेत ५ पैकी ४ मतदारसंघात विजय मिळविला. भाजपच्या मुसंडीपुढे शिवसेनेचा जिल्ह्यात सफाया झाला. सेनेने आकोटची एकमेव जागाही गमाविली. भाजपच्या लाटेत भारिप-बमसंला फटका बसला. या पक्षाने अकोला पूर्वची जागा गमाविली तर बाळापूरचा गड राखण्यात यश मिळविले.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात पाच मतदारसंघात १५ ऑक्टोबर रोजी ७९९३९३ मतदारांनी ९३ उमेदवारांना मतदान केले होते. मतमोजणी रविवारी सकाळी ८ वाजतापासून सुरू झाली. दुपारी १.३0 वाजेपर्यंंंत पाचही मतदारसंघातील निकाल जाहीर झाले. भाजपने पाचपैकी आकोट, अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि मूर्तिजापूर या चार मतदारसंघात विजय मिळविला. बाळापूरचा गड भारिपने कायम राखला. विद्यमान आमदारांपैकी गोवर्धन शर्मा, हरीश पिंपळे आणि बळीराम सिरस्कार पुन्हा निवडून आले आहेत. शेवटच्या क्षणी आकोटमधून भाजपचे तिकीट मिळाल्यानंतरही प्रकाश भारसाकळे यांनी काँग्रेसचे महेश गणगणे यांचा ३१४११ मतांनी पराभव केला. जिल्ह्यात पाचही मतदारसंघात सर्वाधिक ७00८६ मतं भासरकाळे यांना मिळाले. बाळापूर मतदारसंघात काँग्रेस आणि भारिपमध्ये चुरशीची लढत झाली. यात विद्यमान आमदार सिरस्कार यांनी बाजी मारून ६९३९ मतांनी विजय मिळविला. अकोला पूर्व मतदारसंघात सर्वाधिक चुरशीची लढत बघावयास मिळाली. सर्वाधिक २५ उमेदवार असलेल्या या मतदारसंघात आधी शिवसेना तर नंतर भारिपचे विद्यमान आमदार हरिदास भदे यांनी आघाडी घेतली होती. शेवटी भाजपचे रणधीर सावरकर यांनी २४४0 मतांनी विजय मिळवित सर्वांंंनाच आश्चर्याचा धक्का दिला. अकोला पश्चिममध्ये भाजपचे गोवर्धन शर्मा यांनी पाचव्यांदा विजय मिळविला. काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर रात्रीतून राकाँच्या गोटात सामिल झालेले विजय देशमुख यांच्यावर शर्मा यांनी ३९९५३ मताधिक्य घेत विजय मिळविला. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनी १२८८८ मतांनी विजय मिळविला.