भाकड जनावरांसह भारिपची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By Admin | Updated: May 3, 2015 02:13 IST2015-05-03T02:13:25+5:302015-05-03T02:13:25+5:30
शेतक-यांना नको असलेली जनावरे शासनाने ताब्यात घेऊन, मोबदला द्या!

भाकड जनावरांसह भारिपची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
अकोला: गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करून, शेतकर्यांना नको असलेली भाकड जनावरे शासनाने ताब्यात घेऊन, त्यापोटी शेतकर्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करीत भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने भाकड जनावरांसह शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. राज्य शासनामार्फत गोवंश हत्याबंदीचा कायदा करण्यात आला. त्यामुळे बैल विक्रीचे व्यवहार ठप्प झाले असून, जनावरांच्या खरेदी-विक्रीचे बाजार ओस पडू लागले आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने गोवंश कायद्यात सुधारणा करून शेतकर्यांकडील भाकड जनावरे शासनाने ताब्यात घ्यावी, त्यापोटी शेतकर्यांना प्रत्येकी ४0 हजार रुपयांचा मोबदला शासनाकडून देण्यात यावा, या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात भाकड जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील टॉवर चौकस्थित भारि प-बमसंच्या जिल्हा कार्यालयापासून काढण्यात आलेला हा मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक समोरून, तहसील कार्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. यावेळी अँड.प्रकाश आंबेडकर, जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, बालमुकुंद भिरड, काशीराम साबळे यांनी मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांंना मार्गदर्शन केले. त्यानंतर अँड.आंबेडकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.