लाभार्थींना अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:36+5:302021-04-21T04:19:36+5:30
बाळापूर : कोरोनाच्या पार्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने निराधार गोरगरिबांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. अंध, अपंग, विधवा, श्रावणबाळ ...

लाभार्थींना अनुदानाची प्रतीक्षा
बाळापूर : कोरोनाच्या पार्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने निराधार गोरगरिबांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. अंध, अपंग, विधवा, श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
------------------------------------
टेलरिंग व्यवसायाला आली अवकळा!
तेल्हारा: ग्रामीण भागात शिलाई मशीन व्यवसायाला कोरोनाचा फटका बसला आहे. लग्नसराई थांबल्याने टेलरिंग व्यवसायावर अवकळा पसरली आहे. ग्रामीण भागात सरासरी नागरिक कपडे शिवून घालतात; मात्र कोरोनाचा फटका बसल्याने टेलर व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
---------------------------------
कोरोना: अंगणवाडी कर्मचारी संकटात!
अकोला: कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. या कर्मचाऱ्यांना अग्रक्रमाने मानधन देण्याची अंगणवाडी सेविकांकडून होत आहे.
-------------------------------------
खासगी शाळांचे पेपर ऑनलाइन
अकोला: काही खासगी शाळांकडून ‘टेस्ट पेपर’ सुद्धा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांनी काय वाचले, काय लिहिले, गणित कसे सोडविले याची तपासणी संबंधित शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
-----------------------------
फळ प्रक्रिया उद्योगांचा अभाव!
तेल्हारा: फळ उत्पादक शेतकऱ्यांची तालुक्यात संख्या लक्षणीय आहे. शेतकरी शेती, बाग यामध्येच गुरफटलेले असतात. यावर्षी ५० हून अधिक शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजाची लागवड केली आहे, परंतु बाजारपेठ उपलब्ध नसल्याने बागायतदारांना स्वत: च फळे विकावी लागत आहेत.
-------------------------------------
भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त
अकोला: कोरोनाच्या भीतीने जिल्ह्यातील अनेक गावांमधील नागरिक शेतात राहायला गेले आहेत. मात्र कृषिपंपासाठी रात्रीचे भारनियमन असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. भारनियमन बंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
----------------------------------------
चालक, वाहकांना लसीची प्रतीक्षा
अकोला : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला जिल्ह्यातील विविध आगारातील चालक व वाहकांना दररोज प्रवाशांच्या गर्दीशी सामना करावा लागत आहे. परंतु त्यांना मागणी करूनही अद्याप कोरोना लस मिळाली नाही. त्यामुळे चालक व वाहकांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
--------------------------
तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या मार्गाने विक्री
अकोट: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंबाखू, गुटखा व सिगारेटवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या सर्व वस्तूंचे भाव तिप्पट, चौप्पट वाढले आहेत. बंदीत मोठी लूट सुरू असून, छुप्या मार्गाने या वस्तूंची विक्री बिनधास्तपणे सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
----------------------------