भाजप आमदाराला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल; पाेलिस निरीक्षकाची कंट्राेल रुमला बदली
By आशीष गावंडे | Updated: April 21, 2025 19:52 IST2025-04-21T19:52:29+5:302025-04-21T19:52:48+5:30
आमदार हरीश पिंपळे यांचा आरोप

भाजप आमदाराला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल; पाेलिस निरीक्षकाची कंट्राेल रुमला बदली
अकाेला : जनावरांची तस्करी करणारे वाहन जप्त न करता परस्पर साेडून दिल्याच्या मुद्यावरुन बार्शीटाकळी पाेलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांनी शिवीगाळ केल्याचा आराेप मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी केला आहे. आ.पिंपळे यांच्या कार्यकर्त्यालाही शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. याप्रकरणी आमदार पिंपळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर प्रभारी पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे यांनी साेमवार दि.२१ एप्रिल राेजी ठाणेदार तुनकलवार यांना कंट्राेल रुम अटॅच करण्याची कारवाइ केली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील भाजप कार्यकर्ते हरीश वाघ यांनी कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या ट्रकबाबत पोलिस ठाण्यात माहिती दिली हाेती. सदर ट्रक बार्शीटाकळी टी-पॉइंटवर अडवण्यात आला, मात्र त्यानंतर पाेलिसांनी पैसे घेऊन वाहन सोडल्याची बाब हरीष वाघ यांनी आमदार हरिष पिंपळे यांना कळवली. या मुद्यावरुन आ.पिंपळे यांनी ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांना विचारणा केली असता, त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आ. पिंपळे यांनी केला आहे. तसेच कार्यकर्ता हरीश वाघ यांनाही ठाणेदार तुणकुलवार यांनी भ्रमणध्वनीवरुन अर्वाच्य शिवीगाळ केली. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली आहे. दरम्यान, तस्करांच्या ताब्यातून जनावरांना जीवनदान न देता परस्पर वाहन साेडून देणाऱ्या ठाणेदारासह इतर पाेलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाइ करण्याची मागणी आ.पिंपळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे केली. त्या पार्श्वभूमीवर ठाणेदार तुनकलवार यांची तडकाफडकी उचलबांगडी करुन त्यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणेदार वैद्यकीय रजेवर?
यासंदर्भात ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्यासाेबत ‘लाेकमत’ने संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ठाणेदार तुनकलवार वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती आहे.
गृहखात्याकडून दखल
या प्रकरणाची गृहखात्याने गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने सदर प्रकरणी सहाय्यक पाेलिस अधीक्षक तथा अकाेटचे उपविभागीय पाेलिस अधिकारी अनमोल मित्तल यांना प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तसेच बार्शिटाकळी पाेलिस स्टेशनचा तात्पुरता कार्यभार सहाय्यक पाेलिस निरीक्षक दीपक वारे यांच्याकडे साेपविण्यात आला आहे.