दहाची नाणी घेण्यास बँकांची टाळाटाळ
By Admin | Updated: May 24, 2017 01:37 IST2017-05-24T01:37:40+5:302017-05-24T01:37:40+5:30
लोकमतकडून बँकांचे सर्वेक्षण : बाजारात दहा रुपयांमागे दोन रुपयांचा बट्टा

दहाची नाणी घेण्यास बँकांची टाळाटाळ
संजय खांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: भारतीय रिझर्व्ह बँकेचे कोणतेही निर्देश नसताना दैनंदिन व्यवहाराच्या चलनातून दहा रुपयांची नाणी अकोल्यात अघोषित बंद झाली आहेत. त्यामुळे अकोल्यातील राष्ट्रीयीकृत बँका आणि को-आॅपरेटिव्ह, मल्टीस्टेट शेड्युल बँकांनीही दहाची नाणी घेण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. दहाची नाणी घेण्यास कुणी नकार देत असेल तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, असे बँकांचेच अधिकारी सांगतात मात्र दहा रुपयांची नाणी टाळणाऱ्या या बँक अधिकाऱ्यांवर आता करवाई करणार तरी कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित हात आहे.
दहा रुपयांची नाणी बंद झाल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहारातून ही नाणी अघोषित बंद होत आहेत. . लघू उद्योजकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून बाजारपेठेत कुणीही दहाची नाणी स्वीकारत नाही. त्यामुळे हळूहळू दहा रुपयांची नाणी बाद होत आहे. त्यामुळे अनेकांकडे दहाच्या नाण्याचा साठा झाला सर्वसामान्य व्यक्ती आणि दुकानदार दहाची नाणी टाळण्यापर्यंत ठीक होते; मात्र आता अकोल्यातील बँकांदेखील दहा रुपयांची नाणी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘लोकमत’ने अकोला शहरातील राष्ट्रीयीकृत आणि काही मल्टीस्टेट शेड्युल बँकांमध्ये दहा रुपयांची नाणी भरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यात १९०० रुपयांची नाणी नेली असता, बँक अधिकाऱ्यांनी केवळ १ हजार रुपयांची नाणी स्वीकारण्यास संमती दर्शविली. दुसऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेने ९०० रुपयांची नाणी घेतली. शहरातील एक नामांकित शेड्युल बँकेने रक्कम घेण्यास चक्क नकार दिला; मात्र जेव्हा न स्वीकारण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी स्वीकारण्याची तयारी दशविली. दुसऱ्या शेड्युल बँकेने मात्र काहीही कारण पुढे न करता १ हजार रुपये स्वीकारले.
एका खासगी आणि मोठ्या कार्पोरेट बँकेनेदेखील रक्कम घेतली; मात्र १ हजाराच्यावर देऊ नका, असे स्पष्ट सांगितले. एका राष्ट्रीयीकृत बँकेने आधी १ हजाराची नाणी स्वीकारली; मात्र थोड्या वेळानंतर आपले खाते शास्त्री नगरातील ट्रेझरी शाखेतले आहे. त्यामुळे घेता येणार नाही, अशी सबब पुढे केली. हा सर्व प्रकार पाहता बँकाच दहा रूपयांची नाणी नाकारत असल्याचे स्पष्ट करीत आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नाणी नाकारणारऱ्यांविरुद्ध कारवाईची गरज आहे.
बाजारात दलाल सक्रीय
जैन भाजी बाजारातील नोटा बदलून देणाऱ्या व्यावसायिकाने ५० हजार रुपयांची नाणी स्वीकारण्याची तयारी दर्श्विली; मात्र त्याने यासाठी एका दहाच्या नाण्यामागे दोन रुपयांचा बट्टा मोजवा लागण्याचे सांगितले. असेल तेवढी रक्कम आपण घेऊ असेही त्याने सांगितले. एका दहाच्या नाण्यावर दोन रुपये बसल्या ठिकाणी कमाविणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध कारवाई झाली पाहिजे; मात्र पुढाकार घेणार कोण, हा खरा प्रश्न आहे. दोन रुपये बट्टा खाणाऱ्या या व्यक्तीचे बँकेतच कुठेतरी धागेदोरे असण्याची दाट शक्यता आहे.
बँका आणि उद्योजकांकडे साठा
दैनंदिन आर्थिक व्यवहारातून दहाची नाणी बाद झाली असली तरी शहरातील अनेक बँकांकडे आणि उद्योजकांकडे दहाच्या नाण्यांचा मोठा साठा पडून आहे. दहा ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचा साठा गोणीने साठवून ठेवला आहे. ग्राहक बँकांकडे दहाची नाणी घेऊन येतो; मात्र बँकेने देऊ केले तर ग्राहक स्वीकारत नाही, असे चित्र अकोल्यात निर्माण झाले आहे.
दहा रुपयांची नाणी न घेणाऱ्याला लेखी स्वरूपात स्पष्टीकरण मागा. त्यानंतर लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेकडे तक्रार करा, त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई होईल.
- तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक अकोला.
पेट्रोल पंपांवर येणारा ग्राहक दररोज दहाची नाणी देऊन जातो. आमच्याकडे पन्नास हजार रुपये पडून आहेत. शहरातील शेड्युल बँकेत खाते असलेल्या ठिकाणी आतापर्यंत आठ वेळा दहाची नाणी पाठविली. मंगळवारीदेखील २५ हजार रुपये घेऊन शकील नामक कर्मचारी बँकेत गेला; मात्र बँकेच्या व्यवस्थापकाने हजार रुपयांच्यावर रक्कम घेता येणार नाही म्हणून सांगितले. आता याप्रकरणी स्टेट बँक आणि रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केल्याशिवाय पर्याय नाही.
- राहुल राठी, पेट्रोल पंप संचालक, अकोला.
दहा रुपयांची नाणी ग्राहक घेत नसल्याने तीस-पस्तीस हजार रुपयांची रक्कम घरात पडून आहे. बँक अधिकाऱ्यांना विनवणी केली तर हजार रुपये दररोज पाठवा म्हणून सांगतात. बँकेत नाणी ठेवायला जागा नाही असे उत्तर बँक अधिकारी देतात. त्यामुळे अघोषितपणे दहाची नाणी अकोल्यातून बंद झाली असे वाटते. दहाची नाणी घेणाऱ्यांसाठी आपण स्टेट बँकेने काढलेली नोटिस दुकानात लावून ठेवली आहे. चहावाला, आॅटोरिक्षावाला आणि भाजीवालादेखील दहाची नाणी स्वीकारत नाही.
- प्रकाश लोढिया, सराफा व्यवसायी, अकोला.