ग्रामीण भागात बँकेत ठणठणाट!
By Admin | Updated: April 26, 2017 01:59 IST2017-04-26T01:59:28+5:302017-04-26T01:59:28+5:30
शेतकऱ्यांसह खातेदार चिंतेत: तीन दिवसांपासून विड्रॉलच झाला नाही!

ग्रामीण भागात बँकेत ठणठणाट!
अंदुरा : बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत पैसा नसल्यामुळे ठणठणाट आहे. मागील तीन दिवसांपासून बँकेत विड्रॉलच झाला नाही. परिणामी, शेतकऱ्यांसह खातेदारांना पैसे न मिळताच आल्या पावली परतावे लागत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना व खातेदारांना बँकेच्या या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अंदुरा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत परिसरातील सोनाळा, बोरगाव, हातरुण, दुधाळा, खंडाळा, कारंजा रम., नया अंदुरा, मोरझाडी आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांसह नागरिकांचे खाते आहेत. या परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील कापूस व धान्य विकून मिळालेला मोबदला जमा करण्यात आलेला आहे. आता खरीप पिकाच्या नियोजन, तयारीची लगबग सुरू आहे. खरीप पिकाचे नियोजन करताना शेतीच्या मशागतीसाठी व लग्नसराईच्या काळात बँकेकडे पैशांसाठी धाव घेतली असता बँकेमध्ये पैशांचा ठणठणाट आहे. शेतकऱ्यांचा विड्रॉल होत नसल्याने परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील तीन दिवसांपासून बँकेमध्ये विड्रॉल न झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना व खातेदारांना बँकेमधून आल्या पावली परतावे लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अवैध सावकाराजवळून अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसे काढत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
परिसरात अवैध सावकारीत वाढ
४खरीप पिकाचे नियोजन करताना शेतीच्या मशागतीसाठी व लग्नसराईसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत आवश्यकता आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अवैध सावकाराजवळून अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसे काढत आहे. बँकेच्या अशा धोरणामुळे अवैध सावकारीला चालना मिळत आहे.