खातेदाराच्या बँक लॉकरमधील दोन लाखांना लागली वाळवी!
By Admin | Updated: April 1, 2016 00:46 IST2016-04-01T00:46:19+5:302016-04-01T00:46:19+5:30
खातेदारास दोन लाख रुपये बदलून देण्याचे ग्राहक तक्रार निवारण मंचाचे बँकेस आदेश.

खातेदाराच्या बँक लॉकरमधील दोन लाखांना लागली वाळवी!
अकोला: खातेदाराने बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेल्या दोन लाख रुपयांच्या नोटांना वाळवी लागल्याने, त्यांच्या नोटांचे नुकसान झाले. खातेदाराने बँकेकडे तक्रार केल्यानंतरही बँकेने खातेदारास नोटा बदलवून दिल्या नाहीत. त्यामुळे खातेदारास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे खातेदारास सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा गोरक्षण रोड यांनी दोन लाख रुपयांचा नोटा बदलून द्याव्यात आणि न्यायिक खर्च मिळून पाच हजार रुपये द्यावे, असे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.
गोरक्षण रोडवर राहणारे श्रीराम शंकर ढवळे, कमल ढवळे यांनी गोरक्षण रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत संयुक्त लॉकर खाते उघडले आहे. ढवळे दाम्पत्याने महत्त्वपूर्ण दस्तऐवज, दागदागिने आणि रोख रक्कम लॉकरमध्ये ठेवली होती. २ मार्च रोजी कमल ढवळे या बँकेतील लॉकरमधील रक्कम काढण्यासाठी गेल्या असता, त्यांना लॉकरमधील रोख रकमेला वाळवी लागल्याचे दिसून आले. त्यांनी शाखाधिकार्यांना लॉकरजवळ बोलावून नोटा दाखविल्या. त्यावेळी नोटांवर लगेच हिट स्प्रे टाकला. त्यानंतर तक्रारकर्तीने खराब झालेल्या नोटा बदलून देण्यास म्हटले असता, शाखाधिकार्याने पत्र देऊन नोटा बदलविण्यासाठी विभागीय कार्यालयासोबत संपर्क करू, असे स्पष्ट केले. त्यानंतर तक्रारकर्तीने अनेकादा नोटासंबंधी बँकेत जाऊन चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे तक्रारकर्तीने बँकेविरुद्ध ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये धाव घेतली. ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये तक्रारकर्ती व बँकेची बाजू ऐकून घेण्यात आली. बँकेने त्यांची जबाबदारी झटकत, लॉकर हे नोटा ठेवण्यासाठी दागदागिने व दस्ताऐवज ठेवण्यासाठी आहे. बँकेने तक्रारकर्तीस पत्र देऊन विभागीय कार्यालयाला चौकशी करून खराब नोटा परत करण्यात येतील, असे सांगितले होते; परंतु नंतर तक्रारकर्तीची दखल घेतली नाही. बँकेने निष्काळजीपणा व सेवान्यूनता दाखविली. त्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्ष एस.एम. उंटवाले, सदस्य कैलास वानखडे, भारती केतकर यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर तक्रारकर्तीच्या बाजूने निर्णय देत, बँकेने तक्रारकर्तीस दोन लाख रुपयांच्या नोटा बदलून द्याव्यात आणि झालेला शारीरिक व मानससिक त्रास आणि न्यायिक खर्च म्हणून पाच हजार नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश दिला. तक्रारकर्तीच्या बाजूने अँड. ए.के. सराग यांनी काम पाहिले.