बक-यांनी फस्त केली अडीच लाखांची बोरं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 07:37 IST2017-05-11T07:21:30+5:302017-05-11T07:37:59+5:30
अॅसपल बोराची झाडे बकरीच्या कळपाने रातोरात फस्त केल्याची घटना ८ मे रोजी सकाळी उघडकीस आली.

बक-यांनी फस्त केली अडीच लाखांची बोरं !
अकोट : आधीच शेतकरी अडचणीत असताना नवीन प्रयोग म्हणून शेतामध्ये लावलेल्या अॅसपल बोराची झाडे बकरीच्या कळपाने रातोरात फस्त केल्याची घटना ८ मे रोजी सकाळी उघडकीस आली. यामध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान झाले असून, याबाबत सदर शेतकऱ्याने अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
अकोट तालुक्यातील उमरा येथील दामोदर बोंडे यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात विदेशामधून रोपे आणून अॅयपल बोराची लागवड केली, तसेच इतर पिकेसुद्धा पेरली होती. ७ मे रोजी रात्री शेताचे कुंपण तोडून अज्ञात व्यक्तीने शेतात बकऱ्या सोडल्या. या बकऱ्यांनी शेतामधील अॅसपल बोराच्या झाडांसह विदेशी फुलझाडे व इतर पिके फस्त केली. ८ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस पाटलासह शेतकऱ्यांनी शेताची पाहणी केली. याबाबत विजय दामोदर बोंडे यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये उभ्या पिकात बकऱ्या चारून अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले असून, याबाबत चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ग्रामीण भागात शेतकरी पारंपरिक पिके सोडून उत्पन्न वाढीकरिता नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्याकरिता कर्ज काढून पिके वाढवित आहेत; परंतु काही विघ्नसंतोषी लोक उभ्या पिकामध्ये जनावरे चारून शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी बोंडे यांनी केली आहे.