बँक कर्मचा-यांच्या संपाने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प!
By Admin | Updated: November 13, 2014 01:17 IST2014-11-13T01:17:55+5:302014-11-13T01:17:55+5:30
खातेदार त्रस्त, एटीएमवर लागल्या रांगा.

बँक कर्मचा-यांच्या संपाने कोट्यवधीचे व्यवहार ठप्प!
अकोला : गेल्या काही दिवसांत सलग आणि त्यानंतर एक दिवसाआड आलेल्या शासकीय सुट्या उपभोगून राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकारी-कर्मचार्यांनी परत बुधवारी एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला. संपामुळे बँकांमधील व्यवहार परत ठप्प पडल्याने आधीच सुट्यांमुळे वैतागलेल्या खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागला. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान सलग आलेल्या शासकीय सुट्या, त्यानंतर गेल्या आठवड्यात परत एक दिवसाआड आलेल्या सुट्या संपल्यानंतर बँकांमधील आर्थिक व्यवहारांची गाडी रूळावर येणार, तोच बँक कर्मचार्यांनी बुधवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेंशन आणि वेतनवाढीसंदर्भात कर्मचार्यांचा मागण्या रास्त असल्या तरी एवढय़ा सुट्या उपभोगल्यानंतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपल्याच खातेधारकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, अशा प्रतिक्रिया आल्या मार्गी परत जाणार्या ग्राहकांनी व्यक्त केल्या. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील नऊ संघटनांनी पुकारलेल्या या संपात अकोला शहर व जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँका सहभागी झाल्या होत्या. संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांनी शासकीय धोरणाविरुद्ध नारेबाजी व घोषणा देत गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर निदर्शने केली. यावेळी दिलीप पिरके, श्याम माईनकर, यशवंत आंबेकर, प्रशांत अग्नीहोत्री, अभय कुणकर्णी, सुनील दुर्गे, प्रकाश दाते, अतुल करंबळेकर, माधव मोतलग, बैस, सुधीर देशपांडे, पातोडे, शशी जोशी, प्रमोद पाटील, प्रकाश देशपांडे, मुकुंद देशमुख, राजेंद्र गावंडे आदी कर्मचारी उपस्थित होते.