बंजारा बांधवांची ‘काशी’ विकासाच्या दिशेने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:55 IST2016-07-26T00:55:18+5:302016-07-26T00:55:18+5:30
पोहरादेवीत ‘इको टुरिझम’ योजनेंतर्गत १.८६ कोटींची कामे प्रस्तावित.

बंजारा बांधवांची ‘काशी’ विकासाच्या दिशेने!
सुनील काकडे /वाशिम
बंजारा बांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या पोहरादेवीच्या विकासासाठी शासन स्तरावर सर्वंंकष प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महसूल व वनविभागाकडून राबविल्या जाणार्या इको टुरिझम या योजनेंतर्गत पोहरादेवीला पर्यटकीयदृष्ट्या विकसित करण्यासाठी १.८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी सोमवार, २५ जुलै रोजी दिली.
२0१६-१७ मध्ये इको टुरिझम योजनेंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार असून, यासाठी यवतमाळ व पुणे वन वृत्तातील पर्यटनस्थळांच्या विकासाकरिता ५ कोटी २५ लाख ४६ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जांब येथील वनोद्यानसाठी १ कोटी ४१ लाख ५२ हजार, देऊळगाव (वडसा) येथील श्री महालक्ष्मी संस्थानसाठी १ कोटी २ लाख ५८ हजार, धामणगाव देव येथील संत मुंगसाजी महाराज समाधीस्थळासाठी ७४ लाख ३३ हजार, पुणे जिल्ह्यातील मौजे बोपगाव येथील श्री कानिफनाथ मंदिरासाठी २0 लाख १५ हजार रुपये; तर वाशिम जिल्ह्यातील श्री संत सेवालाल महाराज समाधीस्थळाच्या विकासाकरिता सर्वाधिक अर्थात १ कोटी ८६ लाख ८८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या अंतर्गत पोहरादेवी येथे ४४ हेक्टर क्षेत्रावर रोपवन तयार करणे, वनक्षेत्रात निसर्ग परिक्रमा रस्ता तयार करणे, पक्षी निरीक्षण मनोरा तयार करणे, बालोद्यान, वाहन पार्किंंग, वनचेतना केंद्र उभारणे, सौर उज्रेवरील पथदिवे बसविणे आदी कामे केली जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
निसर्गपुरक साहित्यांचा होणार वापर!
वनपरिक्षेत्रात बालोद्यान सुशोभीकरण, निरीक्षण मनोरा, माहिती फलक आदी कामे करीत असताना लोखंडी साहित्याऐवजी निसर्गपूरक साहित्यांचा जास्तीत जास्त वापर करावा, असा महसूल व वन विभागाचा आदेश आहे.