शेती नावावर करण्यासाठी तलाठय़ाने घेतली लाच
By Admin | Updated: January 7, 2015 01:31 IST2015-01-07T01:31:23+5:302015-01-07T01:31:23+5:30
अकोला येथील घटना, शेतीची पत्नीच्या नावावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून तलाठय़ानी घेतली १५00 रुपयांची लाच.

शेती नावावर करण्यासाठी तलाठय़ाने घेतली लाच
अकोला : वारस लागलेल्या शेतीची पत्नीच्या नावावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून १५00 रुपयांची लाच घेणार्या आपातापा, नावखेडच्या तलाठय़ास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वसंत टॉकिजजवळ रंगेहाथ अटक केली.
दापुरा मजलापूर येथील एका शेतकर्याने तलाठय़ाच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानुसार, त्यांच्या कुटुंबातील अडीच एकर शेती वडिलांच्या नावावर आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर शेतीला वारस लागले. तक्रारदाराने आई व बहिणींचे ना-हरकत प्रमाणपत्र लिहून घेतले आणि नमुना ९ सह शेती त्यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी तलाठी हिंमतराव रामभाऊ मानकर (५१) यांच्याकडे अर्ज केला. हिंमतराव मानकर यांनी या कामासाठी शेतकर्याला ३५00 रुपयांची मागणी केली. त्यानुसार शेतकर्याने दोन हजार रुपये दिले. त्यानंतरही मानकर यांनी शेतीचे कागदपत्र देण्यास टाळाटाळ केली आणि पुन्हा लाचेची मागणी केली. त्यामुळे शेतकर्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तलाठी मानकर याने शेतकर्यास पैसे घेऊन मंगळवारी दुपारी वसंत टॉकिजजवळील एका पानपट्टीवर बोलावले. ठरल्यानुसार शेतकरी १५00 रुपये घेऊन टॉकिजजवळ आला. या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचला होता. तलाठी मानकर याने लाचेची रक्कम घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी त्याला रंगेहाथ अटक केली आणि लाचेची रोकड जप्त केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सचिन्द्र शिंदे, निरीक्षक यू. ए. जाधव, मंगेश मोहोड, एएसआय सुधाकर गाडगे, सुरेश महल्ले, संतोष उंबरकर, सुनील राऊत, सुनील पवार, संतोष दहिहांडे यांनी केली.