विद्यार्थ्यांना भेटण्यास पालकांना बंदी
By Admin | Updated: April 8, 2015 01:47 IST2015-04-08T01:47:43+5:302015-04-08T01:47:43+5:30
नवोदय विद्यालयाचा पुन्हा अजब फतवा, नोंदणीसाठी चार सदस्यीय समिती.

विद्यार्थ्यांना भेटण्यास पालकांना बंदी
सचिन राऊत /अकोला: बाभूळगाव जहागिर येथील जवाहर नवोदय विद्यालयात ४९ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना विविध प्रकारे वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत. आता विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलेल्या पालकांना बंदी घालण्यात आली आहे. चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, या समितीकडे नोंद केल्यानंतर समिती वेळ देईल तेव्हाच विद्यार्थ्यांना भेटावे लागेल, असा अजब फतवा नवोदय विद्यालय प्रशासनाने मंगळवारी काढला. नवोदय विद्यालयातील आर. बी. गजभिये, शैलेश रामटेके या दोन शिक्षकांनी विद्यालयातील ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ सुरू केला होता. या प्रकाराला विरोध करणार्या विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण देण्यात येणार नाहीत, विद्यालयातून काढून टाकू, अशा धमक्या देण्यात येत होत्या. प्रकरण सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर विद्यार्थिनींनी प्राचार्यांकडे तक्रारी केल्या. प्राचार्य सुरुवातीला ढिम्म राहिल्याने राज्य महिला आयोगाच्या सदस्यांकडेही तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी फौजदारी कारवाईचे आदेश दिले व पालकांनीही दोन्ही शिक्षकांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दोन्ही शिक्षकांवर पॉस्को अँक्टसह विनयभंगाचे गुन्हे दाखल केले. दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले. शिक्षक अटकेत असून, त्यांचे आणखी दोन साथीदारही जेरबंद आहेत. या प्रकरणानंतर नवोदय विद्यालय प्रशासन अजब-गजब फतवा काढत असून, मंगळवारी त्यांनी विद्यार्थिनींना भेटण्यास चक्क त्यांच्या पालकांनाच मनाई केली.